देशाची राजधानी असलेल्या दिल्ली जवळील गुरुग्राममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी लावण्यात आलेल्या १५ लाखांच्या टाईल्स चोरीला गेल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडसाठी टाईल्सचा वापर करण्यात आला होता. मागील वर्षी १ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी हरियाणा दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी गुडगावच्या लिझर व्हॅली मैदानावर उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार करण्यात आले होते. यासाठी २१.६१ लाख रुपये खर्च करुन २ लाख ८८ हजार मार्बल लावण्यात आल्या होत्या. मात्र या मार्बल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रत्येक टाईलची किंमत साडे सात रुपये होती.

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर हेलिपॅडच्या देखरेखीचे काम गुरुग्राम महानगरपालिकेची होती. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर या वर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गुरुग्राम महानगरपालिकेचे आयुक्त टि. एल. सत्यप्रकाश यांनी लिझर व्हॅली मैदानाचा आढावा घेतला. त्यावेळी टाईल्स गायब झाल्याची माहिती समोर आली. यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल गुरुग्राम महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त व्हि. उमाशंकर यांना सोपवण्यात आला आहे. एकूण २.८८ लाख टाईल्सपैकी २.०९ लाख टाईल्स गायब असल्याची माहिती चौकशी अहवालात आहे. ‘या प्रकरणी चौकशी अहवाल मिळाला असून टाईल्स नेमक्या कुठे गेल्या हे तपासातून समोर येईल,’ असे उमाशंकर यांनी म्हटले आहे.

भाजपच्या एका स्थानिक नेत्यानेच टाईल्सची चोरी केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. ‘एकूण २.८८ लाख टाईल्सपैकी केवळ ७९ हजार टाईल्सच गुरुग्राम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून लावण्यात आल्या होत्या. मात्र उर्वरित २.०९ लाख टाईल्सबद्दल कोणतीही माहिती नाही,’ असे चौकशी अहवालात म्हटले आहे.

हरियाणा राज्याच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १ नोव्हेंबर २०१६ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गुरुग्राममधील ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कप्तानसिंह सोळंकी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर पंतप्रधान मोदी यांना हेलिपॅडवरुन कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी उपस्थित होते.