मुखपृष्ठ हटविण्याचीटाइमची मागणी

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यापासून तेथील प्रसारमाध्यमांवर खोटय़ा बातम्या देत असल्याचे आरोप केले असताना ‘टाइम’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाचे खोटे मुखपृष्ठ तयार करून त्यावर त्यांची छबी झळकावण्यात आल्याचा खोडसाळपणा उघडकीस आला आहे. ही मुखपृष्ठे ट्रम्प मालकीच्या पाच गोल्फ क्लबवर लावण्यात आली असून, ती काढून टाकावीत, असे ‘टाइम’ने ट्रम्प ऑर्गनायझेशनला सांगितले आहे. राजकारणात येण्यापूर्वी १९८९ मध्ये व नंतर २०१६ मध्ये ट्रम्प यांची छबी ‘टाइम’ नियतकालिकावर खरोखर झळकली होती.

ट्रम्प यांच्या मालकीच्या गोल्फ क्लब्जवर जे मुखपृष्ठ लावण्यात आले आहे ते १ मार्च २००९च्या अंकाचे आहे असे भासवण्यात आले असून टाइम नियतकालिकाने ते मुखपृष्ठ बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. या मुखपृष्ठावर ट्रम्प यांनी काळा सूट घातलेला असून हाताची घडी घालून ते करारी मुद्रेत दिसत आहेत. ‘ट्रम्प इज हिटिंग ऑन ऑल फ्रंट्स, इव्हन टीव्ही’ असे त्यावर लिहिलेले आहे. यातील दोन ओळी मात्र २ मार्च २००९च्या टाइम नियकालिकातून घेतलेल्या आहेत. त्यात अध्यक्ष बराक ओबामा, क्लायमेट चेंज व फायनान्शियल क्रायसिस असे उल्लेख आहेत. त्या वेळचा जो खरा अंक आहे त्यावर ऑस्कर विजेती अभिनेत्री केट विन्सलेट हिची छबी आहे. टाइम नियतकालिकाने ही त्यांच्या मुखपृष्ठाची भ्रष्ट नक्कल असल्याचे बीबीसीला सांगितले असून १ मार्च २००९ च्या अंकावर ट्रम्प यांचे छायाचित्र नव्हते असे स्पष्ट केले आहे.

ट्रम्प ऑर्गनायझेशनला हे बनावट मुखपृष्ठ काढून टाकावे असे सांगण्यात आल्याचे टाइमच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. ट्रम्प यांच्या वतीने करण्यात आलेला हा खोडसाळपणा ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने उघडकीस आणला असून, डोरल या मियामीतील रिसॉर्टवर दोन ठिकाणी हे मुखपृष्ठ लावले आहे. व्हर्जिनियातील लंडन कौंटीतील ट्रम्प गोल्फ कोर्सवरही हे मुखपृष्ठ लावण्यात आले आहे. फ्लोरिडात पाम बीचवरील मार ए लागो या ट्रम्प यांच्या आलिशान विश्रामस्थानीही हे मुखपृष्ठ लावल्याचे चित्र छायाचित्रकार स्कॉट किलर यांनी ट्विट केले होते. ट्रम्प हे टाइमच्या मुखपृष्ठावर झळकण्यास महत्त्व देतात असे त्यांच्या सीआयएसमोर जानेवारीत केलेल्या भाषणात स्पष्ट झाले होते. त्यांनी आपलीच छबी या नियतकालिकावर जास्त वेळा झळकल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात रिचर्ड निक्सन यांची छबी जास्त वेळा झळकली होती.