‘टाइम’ मासिकाच्या जगातील सर्वाधिक प्रभावशाली १०० व्यक्तींच्या वार्षिक यादीसाठी संभाव्य दावेदारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही समावेश आहे.

आघाडीचे कलाकार, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, शास्त्रज्ञ, तसेच तंत्रज्ञान आणि व्यापार यातील अग्रणी यांचा समावेश असलेली ही यादी टाइम मासिक पुढील महिन्यात जाहीर करणार आहे.

या यादीतील अंतिम मानकऱ्यांबाबतचा निर्णय मासिकाचे संपादक घेणार असले, तरी मासिकाने आपल्या वाचकांना संभाव्य दावेदारांच्या यादीतील व्यक्तींना मतदान करण्यास सांगितले आहे.

‘टाइम’ मासिकाच्या सर्वाधिक प्रभावशाली १०० व्यक्तींच्या ‘टाइम’ मासिकाच्या जगातील सर्वाधिक प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीतील संभाव्य दावेदारांमध्ये मोदी यांचे गेल्या वर्षीही नाव होते. २०१५ सालच्या जगातील सर्वाधिक १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला होता आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी या मासिकासाठी मोदींची माहिती देणारा लेख लिहिला होता.

गेल्या वर्षी रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन, टेनिस तारका सानिया मिर्झा, अभिनेत्री प्रियंका चोप्रा, भारतीय वंशाचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, तसेच ‘फ्लिपकार्ट’चे संस्थापक बिनी बन्सल व सचिन बन्सल यांची नावे ‘टाइम’च्या १०० सर्वाधिक प्रभावशाली लोकांच्या यादीत होती.

या वर्षीच्या संभाव्य दावेदारांमध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची मुलगी इवान्का ट्रम्प आणि व्हाइट हाऊसचे सल्लागार असलेले तिचे पती जारेड कुशनर, कॅलिफोर्नियाच्या सिनेटर कमला हॅरिस, अभिनेता रिझ अहमद, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे, चीनचे नेते क्षी जिनपिंग, पोप फ्रान्सिस व कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टड्रो वगैरेंचा समावेश आहे.