साधारण आठवड्याभरापूर्वी एका काश्मिरी तरूणाने पुणे बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे सांगत स्वत:ला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. पुण्यातील फरासखाना भागात १० जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असल्याची कबुली या तरूणाने मुंबई पोलिसांच्या विशेष पथकासमोर दिली. या तरूणाची देहबोली आणि भाषेचा लहेजा काश्मिरमधील फुटीरतावादी चळवळीतील दहशतवाद्यांशी जुळत असल्याने पोलिसांनीसुद्धा हे प्रकरण गंभीरपणे घेतले. एकेकाळी आपण दहशतवादी होतो आणि आता पुणे बॉम्बस्फोटाच्या चौकशीत पोलिसांना मदत करण्याची आपली तयारी आहे. त्या मोबदल्यात मला पैसे मिळाले पाहिजेत, असा प्रस्ताव त्याने पोलिसांसमोर ठेवला. त्यानंतर पोलिस तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. मात्र, या तरूणाची कसून चौकशी केल्यानंतर एक वेगळेच सत्य मुंबई पोलिसांसमोर आले.
दहशतवादी असल्याची बतावणी करणाऱ्या बशीर अहमद गोगलूचा प्रत्यक्षात श्रीनगर येथे शालविक्रीचा व्यवसाय असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या ठिकाणी सतत सुरू असणारी फुटीरतावाद्यांची निदर्शने, संप आणि संचारबंदीच्या वातावरणामुळे त्याचा व्यवसाय डबघाईला जाऊन डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. त्यामुळे जेलमध्ये गेल्यावर तरी कर्जबारीपणाच्या ओझ्यातून मुक्ती मिळेल, असा विचार करून बशीर अहमद गोगलूने मुंबई पोलिसांसमोर पुणे बॉम्बस्फोटात सहभाग असल्याची कबुली दिली.
या संपूर्ण तपासादरम्यान, मुंबई पोलिसांनी बशीर अहमदच्या घरी याबद्दलची माहिती कळवली. त्यानंतर लगेचच एका वकिलाकडून न्यायालयात बशीरची केस लढविण्यासाठी १०,००० रूपये ट्रान्सफर करण्याचा फोन येऊन गेला. बशीरची पत्नी लव्हली हिच्यासाठी फोन कॉल्सवरून मिळालेली माहिती धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी होती. नेहमीप्रमाणे माल आणण्यासाठी दिल्लीला जातो असे सांगून एक जुलै रोजी घरातून बाहेर पडलेला तिचा नवरा परतलाच नसल्याचे तिने सांगितले. दिल्लीला जाताना एक हजार रूपये देऊन चार दिवसांत परत येऊ, असे बशीरने तिला सांगितले होते.