वाढत्या महागाईने सर्वसामन्य लोक आता पिचलेले असतानाच दिल्लीमध्ये भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने त्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये टोमॅटो ६० ते ७० रुपये किलोने विकले जात आहेत, तर कंदा तब्बल ४० रुपये किलो मिळत आहे. मुसळधार पावसामुळे उत्तर भागातून पुरेसा पुरवठा न झाल्याने या भाज्यांचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
‘मदर डेरी’च्या सफल दुकानांमध्ये टोमॅटो ५५ रुपये तर कांदा २९ रुपये किलोने मिळत आहे. मात्र स्थानिक व्यापाऱ्यांकडे तो महागडय़ा भावाने मिळत असल्याने सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली. हिमाचल प्रदेशमधून नवी दिल्लीत टोमॅटोचा पुरवठा केला जातो. मात्र मुसळधार पावसाने तेथील टोमॅटोच्या पिकांचे नुकसान झाल्याने पुरवठा कमी झाला आहे. नाशिक आणि बंगळुरूमधूनही टोमॅटोचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या वर्षीच्या दुष्काळाने येथील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील पुरवठाही कमी झाला आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
देशात टोमॅटोला सर्वाधिक भाव भोपाळमध्ये मिळत आहे. या शहरात ८५ रुपये किलोने टोमॅटो मिळत आहे, तर कानपूर आणि पोर्ट ब्लेअर येथे ८० रुपये किलोने टोमॅटो विकले जात आहेत. देशाच्या दक्षिण व पूर्व भागापेक्षा उत्तरेत टोमॅटो अधिक महाग आहेत.