आठजण पैसे देऊन तुरुंगाची हवा खाण्यासाठी तयार झाले होते. त्यांना २० दिवसांसाठी तुरुंगात राहायचे होते आणि यासाठी ते पैसेदेखील मोजायला तयार होते. अशाप्रकारे तुरुंगाची हवा खाणाऱ्यांमध्ये अन्य तीनजणांबरोबर चार इंजिनियर आणि एक ट्रक चालक होता. जेलमधील वास्तव्यासाठी त्यांनी प्रतिदिन ५०० रुपये मोजले होते. तेलंगणामधील एका तुरुंगातील जुन्या भागाची दुरुस्ती करून त्यास म्युझियमध्ये रुपांतरित करण्यात आले आहे. याचा वापर ‘जेल टुरिझम’साठी करण्यात येतो. सर्वसाधारण लोकांना तुरुंगात राहाण्याचा अनुभव घेता यावा यासाठी येथे शुल्क आकारून ठेवण्यात येते. हैदराबादपासून ८० किलोमीटर अंतरावरील हा अतिशय जुना तुरुंग आहे.

आपल्या काही मित्रांनी या तुरुंगाविषयी आपल्याला सांगितल्याचे तुरुंगाची सैर करायला आलेल्या नितीश रेड्डी नावाच्या इंजिनियर तरुणाने सांगितले. मित्रांसोबत जेलमध्ये राहायला आलेला नितीश हैदराबादमध्येच कामाला आहे. ते सर्व आयआयटी मुंबईमध्ये एकत्र शिकत होते. जेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुरुंग प्रशासनाने त्यांचे मोबाईल, पाकीट आणि इतर सर्व सामान काढून घेतले. त्याचबरोबर त्यांना कैद्यांचे कपडे घालायला दिल्याचे नितीशने सांगितले. तो पुढे म्हणाला, जेलमध्ये त्यांना रोज भात आणि रस्सम खायला देण्यात येत होता. ज्याचा स्वाद त्याच्यासह जेलमधील अन्य कोणालाच आवडत नसल्याचे नितीशने सांगितले. ‘जेल टुरिझम’दरम्यान नितीश आणि त्याच्या मित्रांनी तुरुंगातील खऱ्याखुऱ्या कैंद्यांशीदेखील संवाद साधला. तुरुंगातील एका खोलीत केवळ एकाच कैद्याला ठेवण्यात येत असल्याने, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत असल्याचे आणि नंतर झोपायला जात असल्याची माहिती नितीशने दिली.

‘जेल टुरिझम’चा अनुभव घेण्यासाठी आलेला ट्रक चालक टी. श्रीकांतला रात्री खूप अस्वस्थ वाटत असे आणि तो सारखा घरी जाण्याची रट लावत असल्याची माहिती तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्याला सोडण्यात आले.