स्मार्टफोन, टॅबलेट तसेच इतर काही ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीमधून त्या अधिक तापल्यास शंभर प्रकारचे घातक वायू बाहेर पडतात, त्यामुळे त्वचा व नाकातील वाहिन्यांवर वाईट परिणाम होतो. या वायूंचा पर्यावरणावरही घातक परिणाम होत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे. अमेरिकेतील इन्स्टिटय़ूट ऑफ एनबीसी डिफेन्स व चीनमधील तिंगसुआ विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार रिचार्ज करण्याच्या बॅटरीसाठी वापरला जाणारा चार्जर योग्य नसेल तरी वाईट परिणाम होतात. लिथियम आयन बॅटरीज या स्मार्टफोन व इतर उपकरणात वापरल्या जातात. वर्षांला दोन अब्ज उपकरणात या बॅटरीजचा वापर होतो. अलीकच्या काळात अनेक देशांच्या सरकारांनीही विद्युत वाहनांसह इतर उपकरणात लिथियम आयन बॅटरीजच्या वापरास उत्तेजन दिले आहे.

लिथियम आयन बॅटरीजचा वापर अनेक उपकरणात केला जातो, जी सामान्य माणसांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांना या बॅटरीजच्या वापरातील धोकेही माहिती असणे गरजेचे आहे, असे इन्स्टिटय़ूट ऑफ एनबीसी डिफेन्सचे प्रा. जी सन यांनी सांगितले. या बॅटरीजमधून विषारी वायू विघण्याची शक्यता असते. बॅटरी पूर्ण चार्ज केलेली असेल तर त्यातून जास्त विषारी वायू उत्सर्जित होतात. ते वायू कोणते असतात, याचाही उलगडा झाला आहे. त्यांचे उत्सर्जन कशामुळे होते, हे सुद्धा समजल्याने स्मार्टफोन व इतर उत्पादक कंपन्यांना त्याबाबत काळजी घेता येईल. कार्बन मोनॉक्साईड वायूही यात बाहेर पडतो व तो अगदी कमी काळात मानवी आरोग्यात धोका पोहोचवतो. मोटार, विमाने यांच्यातील बॅटरीत गळती झाल्यास त्यात विषारी वायू बाहेर पडण्याचा धोका असतो. या प्रयोगात २० हजार लिथियम बॅटरीज ज्वलनाच्या पातळीपर्यंत प्रयोग करण्यात आले. त्यात विषारी वायू बाहेर पडल्याचे दिसून आले. बॅटरी जास्त तापल्याने या वायूंचे प्रमाण वाढते.