फोनवरील अश्लील संभाषणाची क्लिप प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्याने केरळमधील परिवहन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते ए के शशिंद्रन यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. पण सरकार आणि पक्षाची मूल्य जपण्यासाठी मी राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केरळमधील पर्यटन मंत्री के शशिंद्रन यांची एक ऑडीओ क्लिप स्थानिक वृत्तवाहिनीने जाहीर केली होती. या क्लिपमध्ये शशिंद्रन एका महिलेशी अश्लील भाषेत संभाषण करत असल्याचे समोर आले होते. या प्रकारामुळे शशिंद्रन हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. रविवारी दुपारी शशिंद्रन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. मी मुख्यमंत्र्यांना माझा निर्णय कळवला आहे. सरकार आणि पक्षाच्या मूल्यांना जपत मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. पण मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही असे त्यांनी सांगितले. या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोणत्याही यंत्रणेमार्फत प्रकरणाची चौकशी व्हावी असे त्यांनी स्पष्ट केले. माझ्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. नैतिकतेच्या आधारे मी राजीनामा दिला असे त्यांनी एएनआयला सांगितले.

गेल्यावर्षभरात केरळच्या मंत्र्याला वादांमुळे राजीनामा द्यावा लागल्याची ही दुसरी घटना आहे. सरकारी पदांवर नातेवाईकांना नोकरी दिल्याप्रकरणी यापूर्वी ई.पी जयराजन यांना ऑक्टोबरमध्ये राजीनामा द्यावा लागला होता. जयराजन हे उद्योगमंत्री होते. केरळमध्ये सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा एक घटक पक्ष आहे. राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आले होते. कट्टनाड मतदारसंघातून थॉमस चंडी, तर इथलूर मतदारसंघातून शशिंद्रन यांचा समावेश होता. राष्ट्रवादीने डाव्या आघाडीला पाठिंबा देत मंत्रिपद मिळवले होते.