भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा आरोप

पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस भाजपविरुद्ध हिंसक मार्ग अवलंबित असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. मानवी हक्क संघटनांनी याविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन शहा यांनी केले आहे.

सत्तारूढ पक्षाने हिंसक मार्गाचा अवलंब केला तरी राज्यात भाजपची वाढ ते रोखू शकणार नाहीत, असेही शहा यांनी म्हटले आहे. बंगालमध्ये गेल्या सहा महिन्यांत हिंसाचारात जे बळी पडले त्यांच्या कुटुंबीयांची शहा यांनी भेट घेतली. सत्तारूढ पक्षाच्या विचारसरणीला पाठिंबा न दिल्याने हिंसाचाराचा मार्ग अवलंबिण्यात आल्याचे शहा यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस वगळता कोणालाही अन्य राजकीय पक्षांचा भाग बनण्याचे स्वातंत्र्य नाही का, असा सवाल शहा यांनी केला. अशा प्रकारचा हिंसाचार अन्यत्र कोठेही दिसत नाही, असेही शहा म्हणाले. हिंसाचारात अनेकांचा बळी गेला, अनेक जखमी झाले, त्यांच्या मालमत्तेची हानी झाली, असे शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारवर टीका करताना सांगितले.

पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन शहा यांनी मानवी हक्क संघटनांना केले.

मानवी हक्क संघटनेच्या सदस्यांनी बासिरहाट, बीरभूम आणि अन्य ठिकाणांना भेटी देऊन राजकीय हिंसाचाराची झळ पोहोचलेल्या जनतेशी चर्चा करावी, असेही शहा यांनी म्हटले आहे.