ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणावरून सोमवारी राज्यसभेमध्ये पुन्हा एकदा गदारोळ पाहायला मिळाला. तृणमूल काँग्रेसचे सदस्य सुखेंदू शेखर रॉय यांनी या मुद्द्यावर चर्चेसाठी दिलेली तहकुबीची सूचना राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी फेटाळल्यानंतरही त्यांनी सभागृहात हाच मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांना सभागृहातून दिवसभरासाठी बाहेर जाण्याचे निर्देश हमीद अन्सारी यांनी दिले. सभापतींच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत तृणमूलच्या सर्वच सदस्यांनी सभात्याग केला.
राज्यसभेमध्ये शून्यकाळात सुखेंदू रॉय यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ३६०० कोटी रुपयांच्या या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारामध्ये कोणी लाच घेतली, त्यांची नावे संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केलीच पाहिजेत. संरक्षण मंत्र्यांनी यासंदर्भात निवेदन केले पाहिजे. सरकार या प्रकरणात शांत का आहे, हे सुद्धा आम्हाला समजले पाहिजे. या प्रकरणात नाव आलेले ‘एपी’ कोण आहे? ‘गांधी’ कोण आहे? ‘शशिकांत’ कोण आहे? हे सुद्धा आम्हाला समजले पाहिजे. संरक्षण मंत्र्यांनी यासंदर्भात संसदेत निवेदन केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
शून्यकाळ तहकूब करण्याचा कोणताही नियम नाही, असे सांगत उपसभापती पी. जे. कुरिअन यांनी रॉय यांची मागणी फेटाळली. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासावेळी रॉय यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला. हमीद अन्सारी यांनी त्यांना या विषयावर बोलण्याची परवानगी दिलेले नसल्याचे सांगत शांत बसण्याची सूचना केली. त्यानंतरही रॉय शांत न बसल्यामुळे हमीद अन्सारी यांनी सभापतींच्या अधिकारात त्यांना दिवसभरासाठी सभागृहातून बाहेर जाण्याची सूचना केली.