तिहेरी तलाकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. तिहेरी तलाकसंदर्भात केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा, असा आदेश न्यायालयाने दिला. तसेच कायदा होईपर्यंत या प्रथेवर सहा महिन्यांची बंदी असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने दिलेला हा निर्णय मुस्लिम महिलांसाठी दिलासादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. देशभरातील मुस्लिम महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा मुस्लिम महिलांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. या विजयात पाच महिलांचा मोठा वाटा आहे, असे म्हणावे लागेल. तिहेरी तलाकविरोधात कायदेशीर लढाई लढणाऱ्या या महिलांविषयी जाणून घेऊयात!

शायरा बानो:

उत्तराखंडमधील काशीपूरमधील राहणारी शायरा बानो यांनी गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिहेरी तलाक आणि निकाह हलालाच्या वैधतेला त्यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले होते. मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्व पद्धतही संपुष्टात आणावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. तिहेरी तलाक प्रथेमुळे घटनेतील अनुच्छेद १४ आणि १५ चे उल्लंघन होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. २००१ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. ऑक्टोबर २०१५ मध्ये त्यांना पतीने तलाक दिला होता. तलाकनंतर त्या आपल्या कुटुंबीयांबरोबर राहतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही शाळेत जातात. त्यांचा खर्च भागवायचा कसा हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे. पालकांच्या मदतीने त्या दिल्लीत आल्या आणि अॅड. बालाजी श्रीनिवास यांच्याद्वारे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. इतर महिलांप्रमाणेच माझे हक्कही मला मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे.

आफरीन रहमान:

जयपूर येथील २५ वर्षीय आफरीन रहमान यांनीही तिहेरी तलाकविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. इंदूरमध्ये राहणाऱ्या पतीने त्यांना स्पीड पोस्टद्वारे तलाक दिला होता. मला न्याय हवा आहे, अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली होती. पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले, असा त्यांचा आरोप आहे.

आतिया साबरी:

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील आतिया साबरी यांना पतीने कागदावरच तलाक लिहून नाते तोडले होते. २०१२ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. दोन मुली झाल्याने पती आणि सासरचे लोक नाराज होते. हुंड्यासाठीही त्रास दिला जात होता, असे आतिया यांनी सांगितले होते.

गुलशन परवीन:

उत्तर प्रदेशातील रामपूर येथील गुलशन परवीन यांना पतीने १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तलाक दिला होता. २०१३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.

इशरत जहाँ:

तिहेरी तलाकच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या महिलांमध्ये पश्चिम बंगालमधील इशरत जहाँ यांचाही समावेश आहे. त्यांच्या पतीने दुबईतूनच फोन करून तलाक दिल्याचे इशरत यांनी सांगितले. त्यांचा विवाह २००१ मध्ये झाला होता. त्यांची मुले पतीकडे आहेत. त्यांना जबरदस्ती तिथे ठेवण्यात आले आहे, असा त्यांचा आरोप आहे. मुलांना माझ्याकडे सोपवण्यात यावे आणि त्यांना सुरक्षाव्यवस्था देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. तिहेरी तलाक बेकायदा आहे. मुस्लिम महिलांचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत, असा दावा त्यांनी याचिकेत केला आहे.