मुस्लीम समाजातील दारिद्रय़, अज्ञान, अंधश्रद्धा, कडवा धर्माभिमान, त्यातून निर्माण होणारी सामाजिक विलगता, अधोगती या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच त्यांनी अनुभवल्या होता. मुस्लीम समाजातील हे भयावह वास्तव बदलण्यासाठी तरुणपणीच त्यांनी सत्यशोधनाची मशाल हाती घेतली. केवळ तलाक हे शब्द तीन वेळा उच्चारून मुस्लीम महिलांना पतीपासून अलग करण्याच्या किंवा घटस्फोट घेण्याच्या जुनाट-चालिरीतींच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले. १९६६ मध्ये अशाच तलाकपीडित सात महिलांचा त्यांनी विधान भवनावर मोर्चा काढला. मुस्लीम महिलांची घुसमट त्यांनी सरकारसमोर मांडली.  सात महिलांचा तो मोर्चाच पुढे मुस्लीम समाजातील सत्यशोधनाच्या किंवा सुधारणेच्या चळवळीचा ओनामा ठरला.  त्या थोर सुधारकाचे-बंडखोराचे नाव हमीद दलवाई..

हमीद दलवाई यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना करून मुस्लीम सुधारणेसाठी चळवळ सुरू केली. मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्यावर जास्त धार्मिक पगडा आहे, असे त्यांचे मत होते. मात्र शिक्षणाबरोबर मुस्लीम समाजाचे प्रबोधन करण्यासाठी सुधारणेची चळवळ आवश्यक होती. तोंडी तलाक, बहुपत्नित्व अशा अनिष्ट रूढी-परंपरामुळे मुस्लीम महिलांचे शोषण होते. त्यांची घुसमट व्यक्त करण्यासाठी आणि त्यांनाच त्यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात उभे करण्यासाठी १८ एप्रिल १९६६ रोजी दलवाई यांनी मुंबईत सात महिलांचा मोर्चा काढला. त्या काळात ते मोठे धाडस होते. अशा प्रकारचा मुस्लीम महिलांचा तो पहिलाच मोर्चा असावा, असे मानले जाते. आज तीन वेळा तलाक म्हणून मुस्लीम स्त्रीला पतीपासून अलग करण्याच्या पुरुष वर्चस्ववादी धार्मिक व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला जातो. त्यावर जाहीरपणे चर्चा होत आहे. मात्र त्याचे मूळ त्या सात तलाकपीडित महिलांच्या मोर्चात दिसते. त्यावेळी हमीद दलवाई एकटेच होते. अकेलाही चला था वो, लोग आते रहे, और कारवॉं बनता गया. त्याचा परिणाम आज दिसत आहे.. b