त्रिपुरामधील इंडिजिनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) आणि सत्ताधारी माकपशी संबंधीत त्रिपुरा उपजाती गणमुक्ती परिषद यांच्यातील संघर्षात एका पत्रकाराला जीव गमवावा लागला. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी त्रिपुरा उपजाती गणमुक्ती परिषदेच्या चार कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

त्रिपुरामध्ये आयपीएफटी आणि गणमुक्ती परिषद या संघटनांमध्ये संघर्ष सुरु आहे. बुधवारी मंडई परिसरात दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. स्थानिक वृत्तवाहिनीत काम करणारा पत्रकार शंतनू भौमिक ( वय २८) हा घटनेच्या वार्तांकनासाठी तिथे पोहोचला. यादरम्यान त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी उपजाती गणमुक्ती परिषदेच्या चार कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले आहे. त्याची हत्या का करण्यात आली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मंगळवारपासून त्रिपुरा उपजाती गणमुक्ती परिषद आणि इंडिजिनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरामधील संघर्ष रस्त्यावर पोहोचला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम त्रिपुरामधील १० भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी या हिंसाचारात ६० जण जखमी झाले होते. त्रिपुरा उपजाती गणमुक्ती परिषदेचे कार्यकर्ते प्रचारसभेसाठी जात असताना आयपीएफटीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि हा वाद उफाळून आला. या हिंसाचारात महिला कार्यकर्त्याही गंभीर जखमी झाल्या आहेत.