देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना पंजाबमधील जालंधरमध्ये घडली आहे. जालंधर-अमृतसर द्रुतगती मार्गावरील सरब मल्टिप्लेक्ससमोर वेगात असलेला ट्रक उड्डाणपुलावरुन खाली कोसळला. ट्रकच्या पुढील चाकाचा ऍक्सल तुटल्याने हा अपघात झाला. विशेष म्हणजे या अपघातातून एक सायकलस्वार अगदी थोडक्यात बचावला. ट्रकचे चाक खाली येत असल्याचे दिसताच सायकलस्वार लगेच बाजूला झाला आणि त्याने अक्षरश: मृत्यूला मात दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

रात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघातातून ट्रक चालक थोडक्यात बचावला. पुढील भागातील ऍक्सेल तुटल्याने ट्रकचे चाक निघाले आणि ट्रक थेट उड्डाणपुलावरुन रस्त्यावर कोसळला. हा ट्रक उड्डाणपुलाखाली असणाऱ्या रिक्षावर कोसळला. या अपघातात रिक्षा चालक आणि ट्रक चालकाला गंभीर इजा झाली आहे. दोन्ही जखमी चालकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही वेळात घटनास्थळी पोलीस दाखल झाले.