ओबामा प्रशासनाच्या काळात अमेरिकेच्या सर्जन जनरलपदी नियुक्त करण्यात आलेले भारतीय वंशाचे डॉ. विवक मुर्ती यांना ट्रम्प सरकारने पद सोडण्यास सांगितले आहे. ट्रम्प प्रशासनाला आपल्या पसंतीच्या व्यक्तीची या पदावर नेमणूक करायची आहे. अमेरिकन प्रशासनात वरिष्ठ पदावरून पायउतार होणारे मुर्ती हे दुसरे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. यापूर्वी अॅटर्नी जनरलपदावरून प्रीत भरारा यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
अमेरिकच्या आरोग्य आणि मनुष्य सेवा मंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. अमेरिकन पब्लिक हेल्थ सर्व्हिस कमिशन्ड कॉर्प्सने मूर्ती यांना ट्रम्प प्रशासनाला सत्ता हस्तांतरण करण्यास सरकारला मदत केल्यानंतर आता त्यांनी सर्जन जनरल पदाचा राजीनामा द्यावा, असे त्यात म्हटले. मुर्ती हे आता फक्त कमिशन्ड कॉर्प्सचे सदस्य म्हणून काम पाहतील.

अमेरिकेचे १९ वे सर्जन राहिलेले ३९ वर्षीय मुर्ती या पदावर नियुक्त होणारे पहिले भारतीय-अमेरिकन व्यक्ती होते. त्यांनी पदावरून पायउतार झाल्यानंतर सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले. भारताच्या एका गरीब शेतकऱ्याचा नातूची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाच्या आरोग्याची रक्षा करण्याची जबाबदारी दिली. ही सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट होती. ज्या देशाने सुमारे ४० वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबीयाचे स्वागत केले आणि मला सेवेची संधी दिली. त्यांचा मी कायम ऋणी राहील. मुर्ती यांच्या जागी सध्या डेप्यूटी सर्जन जनरल रिअर अॅडमिरल सेल्विया ट्रेंट-अॅडम्स यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.
मुर्ती यांची २०१४ साली अमेरिकेच्या सिनेटने हे पद सोपवले होते. त्यांच्या नियुक्तीला अमेरिकेच्या गन कल्चर समर्थक लॉबीने मोठा विरोध केला होता. मूर्ती हे मुळचे कर्नाटकचे आहेत. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. ते तीन वर्षांचे असताना अमेरिकेत आले होते. त्यांनी येल स्कूल ऑफ मेडिसीनमधून एमडी पदवी पूर्ण केली. त्यांनी तेथूनच एमबीए पूर्ण केले होते.