मोदी-ट्रम्प भेटीपूर्वी  ट्रम्प प्रशासनाने स्पष्टीकरण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत भारताकडून एच-१ बी व्हिसाचा वादग्रस्त मुद्दा उपस्थित करण्यात आल्यास अमेरिका त्याला प्रतिसाद देईल, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.

एच-१ बी व्हिसाच्या मुद्दय़ावर चर्चा करण्याची कुठलीही योजना नाही, तथापि भारताने हा मुद्दा मांडल्यास त्यावर चर्चा करण्यास अमेरिका तयार आहे, असे एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने व्हाइट हाऊसमध्ये होणाऱ्या मोदी-ट्रम्प भेटीपूर्वी पत्रकारांना सांगितले.

ट्रम्प प्रशासनाने एच-१ बी व्हिसाबाबत (काम व इमिग्रेशन) काही कार्यकारी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार परराष्ट्रमंत्री, अॅटर्नी जनरल, कामगारमंत्री व अंतर्गत सुरक्षामंत्री यांना एच-१ बी व्हिसा कार्यक्रमात अमेरिकेच्या हिताचे बदल सुचवण्यास सांगण्यात आले आहे, असे हा अधिकारी म्हणाला.

मात्र, तूर्तास व्हिसाकरिता अर्ज करण्यात किंवा व्हिसा जारी करण्याच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आलेले नाहीत. नंतर जे बदल केले जातील त्याचा काय परिणाम होईल हे आम्ही आताच सांगू शकत नाही. कुठल्याही देशाला डोळ्यासमोर ठेवून व्हिसा धोरणात बदल केलेले नाहीत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.