अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर यांच्यासारखे किंबहुना त्याहून अधिक तीव्र मानसिक गुणधर्म आहेत, असे ऑक्सफर्डमधील एका अभ्यासात सांगण्यात आले आहे. सायकोपाथ किंवा मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींचा अभ्यास पीपीआय-आर चाचणीत केला जातो, त्यानुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ऑक्सफर्डचे मानसशास्त्रज्ञ केविन डटन यांनी अमेरिकेतील अध्यक्षीय उमेदवार ट्रम्प यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. त्यासाठी ‘सायोपॅथिक पर्सनॅलिटी इन्व्हेन्टरी रिव्हाइज्ड’ ही पद्धत वापरण्यात आली.

ट्रम्प यांनी सामाजिक प्रभाव व निर्भीडपणा यात हिटलरला मागे टाकले असून अहंगंड केंद्रितता तसेच निर्ढावलेपणा या गुणांचा समावेश आहे. त्यांच्यात सहवेदना कमी असून स्वत:च्या उद्दिष्टपूर्तीसाठी इतरांशी तोडून वागण्याचा त्यांचा स्वभाव आहे. ट्रम्प यांच्या तुलने हिलरी क्लिंटन या रोमन सम्राट नीरो याच्या पुढे असून नीरो हा अहंगड निकषात दहाव्या क्रमांकावर होता.

राजकीय नेत्यांच्या स्वभाव वैशिष्टय़ांबाबत तज्ज्ञांना ५६ प्रश्न विचारण्यात आले होते, त्यावरून ट्रम्प व क्लिंटन यांच्या मानसिक गुणधर्माचे मापन करण्यात आले. निर्ढावलेपणा, अहंगंड, निर्दयता, आत्मविश्वास, करिष्मा, अप्रामाणिकपणा, सहवेदनेचा अभाव व विवेकबुद्धी या कसोटय़ा त्यासाठी लावण्यात आल्या. या चाचण्यात हिटलरचे १६९ गुण आहेत तर ट्रम्प यांचे १७१ गुण झाले आहेत.

मार्गारेट थॅचर यांचे १३६ तर एलिझाबेथ १ यांचे १३० गुण होते. इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचे सर्वाधिक १८९ गुण होते. डटन यांच्या मते पीपीआय-आर चाचणी कुणाला मनोरुग्ण ठरवत नाही, केवळ त्यात आठ मानसिक कसोटय़ांच्या आधारे मापन केले जाते. निर्भीड व वर्चस्ववादी गुणात ट्रम्प यांनी सर्वाना मागे टाकले आहे. ‘जर्नल सायंटिफिक अमेरिकन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.