अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतील भारतीय समुदायापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नाअंतर्गत त्यांच्या सुनेने व्हर्जिनियामधील एका मंदिरात दिवाळी साजरी केली. अमेरिकेतील व्हर्जिनिया हे असे राज्य आहे जिथे डेमॉक्रॅटिक अथवा रिपब्लिकन उमेदवारांपैकी कोणालाही मोठ्या संख्येने बहुमत मिळण्याची स्थिती दिसत नाही. आठ नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण निवडणुकीत आपले सासरे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध एक नवी उंची गाठतील, असे मत ट्रम्पचे चिरंजीव एरिक ट्रम्प यांची पत्नी लारा ट्रम्पने व्यक्त केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात भारत आणि भारतीयांविषयी अत्यंत स्नेह आणि प्रेम भावना असल्याचेदेखील लारा म्हणाली. भारतीय परंपरेचा आदर बाळगणाऱ्या लाराने व्हर्जिनियाच्या राजधानीतील मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले.

यावेळी बोलताना ती म्हणाली की, मला खरोखरच हिंदू संस्कृती आवडत असून मी त्याचा सन्मानदेखील करते. ट्रम्प कुंटुंबियांच्या आगमनाने राज्यात दिवाळीचे आगमन लवकर झाल्याची भावना अमेरिकेतील भारतीय समुदायाचे एक कार्यकर्ता राजेश गूटी यांनी मंदिर परिसरात ट्रम्प परिवाराचे स्वागत करताना व्यक्त केली.

दिवाळी साजरी करण्यासाठी लारा ट्रम्पला मंदिरात आमंत्रित करण्यामध्ये गूटी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ट्रम्प कुटुंबियांनी मंदिरास भेट दिल्याने स्थानिक भारतीय-अमेरिकी समुदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विभिन्न धर्मांमधील विविध समारंभात सामील होत नव्या ऊर्जेने भाग घेत सहायता देणे सुरू ठावणार असल्याचेदेखील गूटी म्हणाले.

सुरुवातीला खरेतर ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प मंदिरात येणार होती. परंतु निवडणुकीसाठीच्या प्रचाराने वेग घेतला असल्याकारणाने तिला अन्य ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. लाराने भेट दिलेल्या मंदिराचे उद्घाटन २००० मध्ये करण्यात आले होते. लाउडन काउंटीमधील हे सर्वात जुने मंदिर आहे. या परिसरात भारतीय अमेरिकी समुदायाने गेल्या एक दशकात अतिशय जलद गतीने विकास केला आहे, असे पहिल्यांदाच होत आहे की अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या दोन मुख्य उमेदवारांपैकी कोण्या एकाच्या कुटुंबातील सदस्याने हिंदू मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले.