गुजरातेतील सागरी किनाऱ्यावर असलेल्या ढोलविरा या पाचव्या मोठय़ा शहराचे पूर्वी मोठय़ा सुनामीने नुकसान झाले असावे, असे सीएसआयआरच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेने केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. या शहराला हडप्पन संस्कृतीचा वारसा आहे.

ढोलविरा हे ठिकाण हडप्पन संस्कृतीतील मोठे शहर आहे व त्या काळातही ते बंदराचे शहर होते. आतापर्यंतच्या संशोधनानुसार या भागात मोठय़ा सुनामी नवीन नाहीत. ढोलविराची रूंद भिंतही सुनामीपासून रक्षणासाठी बांधलेली होती. त्या काळातही सागरी आपत्ती व्यवस्थापन केले जात होते. एनआयओचे संचालक डॉ. नक्वी यांनी सांगितले की, या अभ्यासातून ढोलविराचे नवे पैलू पुढे आले आहेत. ढोलविराचे एकेकाळी सुनामी लाटांमुळे नुकसान झाले असावे. गोवा येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेने केलेले संशोधन त्यांनी सादर केले.

राजीव निगम यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांनी हा अभ्यास केला असून ढोलविराची भिंत हा चर्चेचा मुद्दा ठरला होता. अभ्यासात असे दिसून आले की, तेथे सुनामीपासून संरक्षणासाठी जाड भिंत बांधलेली होती व वादळापासून संरक्षण हा त्यामागील आणखी एक हेतू होता. ही शहरी वस्ती १५०० वर्षांच्या काळात उभी राहिली. तेथील वसाहतींमध्ये मध्य शहर, किल्ले, सखल शहर असे भाग दिसतात. तेथे १४-१८ मीटर जाडीची भिंत असून ती संरक्षणात्मक उपाय म्हणून बांधलेली आहे. ऐतिहासिक काळात इतक्या जाडीच्या भिंती दिसत नाहीत, अगदी  घातक शस्त्रांच्या वापर काळातही अशा भिंती नव्हत्या.

पुरातत्त्व वैज्ञानिक व भूगर्भशास्त्रज्ञ यांनी रडार व मातीच्या नमुन्यांच्या मदतीने संशोधन केले आहे. २८ नोव्हेंबर १९४५ रोजी मकरान येथे भूकंप होऊन त्यातील सुनामीत मोठे नुकसान झाले, त्या वेळी दहा मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. ढोलविरात खडकांची निर्मिती कशी व केव्हा झाली याचे कालानुमान अजून काढता आलेले नाही.