इस्तंबूल विमानतळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तुर्कस्तानने गुरुवारी १३ संशयित आयसिस दहशतवाद्यांना ताब्यात घेतले.

तुर्कस्तानच्या अतातुर्क विमानतळावर बुधवारी करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात आणि गोळीबारात ठार झालेल्यांची संख्या आता ४२ वर पोहोचली असल्याचे अनादोलू या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या हल्ल्यात १३ परदेशी नागरिक ठार झाले तर २००हून अधिक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी गुरुवारी पहाटे इस्तंबूलमध्ये जवळपास १६ ठिकाणी छापे टाकले आणि तीन परदेशी नागरिकांसह आयसिसच्या संशयितांना ताब्यात घेतले. किमान एक हल्लेखोर परदेशी नागरिक असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी तुर्कस्तानवर अनेक हल्ले  करण्यात आले असून ते प्रामुख्याने आयसिस किंवा कुर्द बंडखोरांनी घडविल्याचा संशय आहे. उन्हाळ्याच्या सुटीचा पर्यटन मोसम सुरू होतानाच हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे कोणत्या शक्ती आहेत त्याचा छडा लावण्यासाठी व्यापक तपास केला जात असल्याचे तुर्कस्तानचे अंतर्गतमंत्री इफकान आला यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. आयसिसबाबत अन्य नावाचा वापर करून आला म्हणाले की, दाइश बंडखोरांकडे अंगुलीनिर्देश होत असला तरी तसे निष्पन्न झालेले नाही.