समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून सौरशक्तीच्या मदतीने पेयजल तयार करण्याच्या क्रांतिकारी तंत्रज्ञानाच्या चाचण्या भारतात यशस्वी झाल्याचा दावा त्याच्या निर्मात्यांनी केला आहे.
इंग्लंडमधील डिसोलेनेटर या कंपनीने हे पेटंटकृत तंत्रज्ञान सागराच्या पाण्यापासून पेयजल तयार करण्यासाठी वापरले आहे. रोज पंधरा लिटर पेयजल सागरी जलापासून तयार करणाऱ्या या यंत्रणेत सौरऊर्जा वापरली जाते. त्यात चलत भाग नाहीत किंवा छानक (गाळण्या) नाहीत. त्यामुळे त्याची देखभाल करणे सोपे आहे. या एका यंत्राच्या मदतीने एका घराला २० वर्षे पाणी मिळू शकते, असा दावा  कंपनीने केला आहे. या यंत्राचे पूर्वरूप तयार करण्यात आले असून कंपनीने इंडिगोगो क्राउडफंडिंग मोहीम राबवली आहे.डिसोलेनेटर कंपनीने हे तंत्रज्ञान इंग्लंडमध्ये विकसित करण्यात आले असून त्याच्या पाच यंत्रांची चाचणी भारतात यशस्वी झाली आहे. दक्षिण भारतातील लोकांसाठी आम्ही प्रथम ते चाचणीसाठी उपलब्ध करून देणार असून नंतर डेसोलेनेटरची निर्मिती केली जाणार आहे. अंतिम रूपातील यंत्र ऑक्टोबर २०१५ पर्यंत तयार होणार आहे.
हवामान बदल व लोकसंख्या वाढ यामुळे जगात पाण्याचा पेचप्रसंग आहे व ९७ टक्के पाणी सागरात असून ते खारट आहे. त्यामुळे जलपेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी आम्ही हे यंत्र तयार केले आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम जॅनसेन यांनी सांगितले.
समुद्राचे पाणी पेयजलात रूपांतर करण्याला ‘निक्षारीकरण’ असे म्हटले जाते. जगातील ०.७ टक्के पेयजल सागरापासून बनवले जाते, पण सध्याचे तंत्रज्ञान महागडे व अकार्यक्षम आहे, त्याला जगातील ०.५ टक्के ऊर्जा वापरली जाते.
डिसोलेनेटर हे वेगळे यंत्र असून त्यात सौर शक्ती वापरली आहे. सौर किरणांची तीव्रता जास्तीत जास्त वापरून, औष्णिक, विद्युत व उष्णता तंत्राने सागराचे पाणी पेयजलात रूपांतरित केले जाते, असे जॅनसेन यांनी सांगितले.

डिसोलेनेटर यंत्राची वैशिष्टय़े
ऊर्जेत बचत
पहिले यंत्र ऑक्टोबर २०१५ पर्यंत येणार
प्रत्येक घराला २० वर्षे पाणी पुरवण्याची सोय
रोज १५ लिटर पाण्याचे पेयजलात रूपांतर