लेखिका अरुंधती रॉय यांच्याबद्दलचे वादग्रस्त ट्विट डिलिट करण्यासाठी ट्विटरने दबाव आणल्याचा आरोप अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल यांनी केला आहे. परेश रावल यांच्या विधानावर देसभरातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. मात्र तरीही आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे रावल यांनी म्हटले आहे.

लेखिका अरुंधती रॉय यांच्याबद्दलचे वादग्रस्त ट्वीट डिलिट केल्यानंतर परेश रावल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ‘मला या पत्राच्या माध्यमातून माझ्या समर्थकांना आणि देशातील नागरिकांना ट्विटबद्दल माहिती द्यायची आहे. ट्विटरने दबाव आणून जबरदस्तीने मला ट्विट डिलिट करण्यास सांगितले. अन्यथा ट्विटरकडून माझे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले असते,’ असे परेश रावल यांनी पत्रात म्हटले आहे.

परेश रावल यांचे प्रसिद्धीपत्रक
परेश रावल यांचे प्रसिद्धीपत्रक

काश्मीरमधील बडगाममध्ये एप्रिल महिन्यात लष्कराच्या जीपसमोर एका स्थानिकाला बांधण्यात आले होते. मेजर गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्या जमावापासून बचाव करण्यासाठी ही कृती केली होती. याबद्दल बोलताना ‘दगडफेक करणाऱ्या व्यक्तीऐवजी अरुंधती रॉय यांना लष्कराच्या जीपसमोर बांधायला हवे होते,’ असे वादग्रस्त ट्विट परेश रावल यांनी २१ मे रोजी केले होते. परेश रावल यांच्या विधानानंतर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी रावल यांच्या विधानाचे समर्थन केले, तर काहींना त्यांच्या विधानाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

गुजरातमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या परेश रावल यांनी प्रसिद्धीपत्रातून ट्विटमधील विधानावर ठाम असल्याचे सांगितले. ‘मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी माझ्या भावना पक्षपात न करता, धार्मिक, जातीय भेद न बाळगता व्यक्त केल्या आहेत. माझे माझ्या देशावर प्रेम आहे. मा अविचलपणे माझ्या देशाच्या बाजूने उभा आहे. मी देशाच्या नागरिकांच्या आणि जवानांच्या बाजूने कायम उभा राहिलो आहे आणि यापुढेही राहिन,’ असे रावल यांनी म्हटले.

गायक अभिजीतचे ट्विटर अकाऊंट वादग्रस्त ट्विट्समुळे ट्विटरकडून डिलिट करण्यात आले आहे. महिलांविरोधात वादग्रस्त विधाने केल्यामुळे अभिजीतचे अकाऊंट डिलिट करण्यात आल्याची माहिती ट्विटरकडून देण्यात आली आहे. यानंतर गायक सोनू निगम यानेदेखील ट्विटरला रामराम करत असल्याचे सांगितले होते.