बिहारच्या पाटणा येथे सोमवारी दोन लष्करी जवानांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये दोन्ही जवानांचा मृत्यू झाला आहे. पाटणा शहरातील धानापूर छावनी भागात हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

लष्कराकडून या जवानांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. मात्र, प्राथमिक माहितीनुसार भाड्याच्या खोलीत राहण्यावरून या जवानांमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, त्यांनी आपल्याकडील पिस्तुलामधून एकमेकांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या दोघांपैकी एक जवान दानापूर भागात भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचा मित्र असलेला दुसरा जवानही याच ठिकाणी राहण्याची सोय पाहत होता. मात्र, येथे राहण्यावरून या दोघांमध्ये वाद झाल्याने त्यांनी थेट आपल्याकडील पिस्तुलच बाहेर काढले आणि एकमेकांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.

या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही जवानांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. मात्र, अद्याप या दोघांमधील भांडणाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच बिहार रेजिमंटचे लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेचा आढावा घेतला.