श्रीनगरमध्ये सोमवारी दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये तीन पोलीस मृत्युमुखी पडले. पहिला हल्ला श्रीनगरमधील झाडीबालमध्ये झाला. अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये दोन पोलीस मृत पावले. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच झाडीबालमध्ये अशा प्रकारे दहशतवादी हल्ला झाला.
दुसऱ्या हल्ल्यामध्ये संशयित दहशतवाद्यांनी तेंगपोरामध्ये केलेल्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडला. मोहम्मद शफी चटवाल असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरही पळवून नेली.
झाडीबाल पोलीस ठाण्याजवळ २०० मीटरच्या अंतरावरून दहशतवाद्यांने दोन्ही पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. सहायक पोलीस उपनिरीक्षक नझीर अहमद आणि कॉन्स्टेबल बशीर अहमद अशी मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. घटना घडली त्यावेळी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांकडे त्यांची शस्त्रे नव्हती. त्यामुळे प्रतिकार करण्याची संधीच त्यांना मिळाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.