चीनने दोन मुलांचे धोरण जाहीर केले असले, तरी त्याला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला असून खर्च वाढल्याने आता लोकांना दोन मुले नको आहेत, असे अधिकृत पाहणीत दिसून आले आहे.
‘चायन यूथ डेली’ने एक पाहणी केली असून त्यात तीन हजार लोकांना दोन मुलांच्या धोरणाबाबत प्रतिसाद विचारण्यात आला होता त्यात निम्म्या महिला होत्या. या पाहणीत असे दिसून आले, की ४६ टक्के प्रतिसादकांनी दुसरे मूल होऊ देण्यास तयार असल्याचे म्हटले असून ५२ टक्के प्रतिसादकांनी दुसरे मूल नको असल्याचे स्पष्ट केले. वादग्रस्त एक मूल धोरणानंतर अलिकडेच चीनमधील प्रशासनाने लोकसंख्येचा समतोल साधण्यासाठी दोन मुले होण्यास परवानगी देणारे धोरण जाहीर केले होते, देशात काम करण्यासाठी तरुण मनुष्यबळ कमी असल्याने हा धोरणात्मक बदल करण्यात आला पण त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. बीजिंग येथील एका रहिवाशाला पहिली मुलगी असून त्याने सांगितले, की मला दुसरे मूल नको आहे कारण आता आर्थिक खर्च वाढत चालला आहे. ईशान्य चीनमधील लायोनिंग प्रांतात असलेल्या शेन्यांग विद्यापीठाचे लोकसंख्या अभ्यास विषयक प्राध्यापक श्रीमती वँग लिबो यांनी सांगितले, की दुसरे मूल वाढवण्याने जीवनमान खालावेल ही समजूत चुकीची आहे. दुसरे मूल होण्याने त्या जोडप्याला सगळ्या वस्तू नव्या घ्याव्या लागणार नाहीत, पहिल्या मुलाने वापरलेल्या वस्तूंमध्ये काम भागू शकते. श्रीमती वँग हायफेंग यांनी सांगितले, की माझा मुलगा चौथीत आहे पण आता शिक्षणाचा खर्च वाढला आहे. शिकवणीचा खर्च ३० ते ४० हजार युआन आहे. त्यामुळे दुसरे मूल परवडणारे नाही. अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार दोन मुलांचे धोरण पुढील वर्षी लागू होत असून त्यात २०५० पर्यंत ३ कोटींचे मनुष्यबळ निर्माण होण्याची अपेक्षा आहे व त्यामुळे आर्थिक विकास दर ०.५ टक्क्य़ांनी वाढेल असा अंदाज आहे.