सहा दहशतवादी ठार; एक जवान हुतात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला असता दोन चकमकीत सहा दहशतवादी ठार तर एक जवान हुतात्मा झाला. पोलीस व लष्कराने संयुक्तपणे ही माहिती दिली आहे. एका घटनेत उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक घुसखोरीविरोधातील मोहिमेत चार दहशतवादी ठार झाले, असे लष्कराने आज सांगितले. लष्कराचे हवालदार हांगपांड दादा हे पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले. दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले असून तेथे चार एके ४७ रायफली सापडल्या. ३६ वर्षीय हवालदार दादा यांनी घुसखोरविरोधी मोहिमेचे नेतृत्व केले त्यात ते जखमी झाले व नंतर त्यांना लष्करी रुग्णालयात हलवले जात असताना त्यांचा मृत्यू झाला. दादा यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा आहे. या कारवाईची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात दहशतवाद्यांच्या हालचाली दिसल्यानंतर कारवाई करण्यात आली. घुसखोरीचा प्रयत्न सतत लक्ष ठेवून हाणून पाडण्यात आला. चार दहशतवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही. सुरक्षा दले अजूनही संबंधित ठिकाणी शोध घेत आहेत. दुसऱ्या एका घटनेत बारामुल्ला जिल्ह्य़ातील तनमार्ग येथे हिज्बुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी ठार झाले असे पोलिसांनी सांगितले. येथून ३५ कि.मी अंतरावर कोंची पोरा येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी चकमक झाली त्यात पोलीस, लष्कर व केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे जवान सहभागी होते यात दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगण्यात आले पण त्यांनी गोळीबार सुरू केला त्यात मेहराज अहमद बट व आदिल अहमद हे पट्टनचे व सोपोरचे रहिवासी असलेले दहशतवादी ठार झाले. त्यांचा हिज्बुल मुजाहिद्दीनशी संबंध होता त्यांच्याकडे दोन एके ४७ रायफली सापडल्या, यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.