मलेशियाच्या एमएच३७० या बेपत्ता विमानप्रकरणी मलेशिया एअरलाइन्स आणि मलेशिया सरकारच्या विरोधात निष्काळजीपणाचा आरोप करणारी पहिली याचिका दाखल करण्यात आली आहे. सदर दुर्घटनेत वडिलांना मुकावे लागलेल्या दोन भावांनी सदर याचिका केली आहे.
जी किन्सन (१३) आणि जी कनिलॅण्ड (११) या दोघा भावांचे वडील जी जिंग हँग सदर विमानात होते. सदर दोन भावांनी कुआलालंपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आपल्याला झालेला मानसिक त्रास आणि भावनिक वेदना याबाबत नुकसानभरपाईची मागणी त्यांनी केली आहे.
सदर विमान रडारवरून गायब झाल्यानंतर त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्नही न करून एअरलाइन्सने निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप या भावंडांनी सिव्हिल एव्हिएशन विभागाविरुद्ध केला आहे. आपली आई एनची पर्ल िमग हिच्या वतीने याचिका करण्यात आली आहे.
सदर विमान ८ मार्च रोजी नियोजित वेळेत बीजिंगला न उतरल्याने मलेशिया एअरलाइन्सने उड्डाण कराराचाही भंग केल्याचे याचिकेत म्हटले आहे. विमानाचे तिकीट काढले तेव्हाच वडिलांनी एअरलाइन्सबरोबर सुरक्षित प्रवासाचा करार केला, असेही भावंडांचे म्हणणे आहे.