दहा सैनिकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या सियाचेनच्या बर्फाच्छादित भागात हिमवादळे आणि आत्यंतिक वाईट वातावरण यामुळे भारताला दर महिन्याला सरासरीने दोन सैनिक गमवावे लागले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या तैनातीला प्रत्युत्तर म्हणून हिमालयातील या वादग्रस्त भागात भारताने ३२ वर्षांपूर्वी सर्वप्रथम आपले सैन्य पाठवले होते.
लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, १९८४ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत एकूण ८६९ भारतीय सैनिक सियाचेन हिमनदीमध्ये कर्तव्य बजावताना मरण पावले. गेल्या ३ फेब्रुवारी रोजी हिमवादळाने चौकी उद्ध्वस्त केल्याने मद्रास रेजिमेंटचे १० जवान मरणाच्या दाढेत ढकलले गेले. यावर्षी त्यापूर्वी मरण पावलेले चारजण जमेस धरून सियाचेनमधील भारतीय सैनिकांची मृत्यूसंख्या ८८३ वर पोहचली आहे. यात ३३ अधिकारी, ५४ ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि इतर पदांवरील ७८२ सैनिकांचा समावेश आहे.
सियाचेनमध्ये मरण पावलेल्या सैनिकांची संख्या २०११ सालच्या २४ वरून २०१५ साली ५ पर्यंत घटली असल्याचेही या माहितीत म्हटले आहे. हे सर्वच मृत्यू शत्रूसैन्याच्या गोळीबारात नव्हे, तर हिमवादळे किंवा आत्यंतिक प्रतिकूल वातावरण यामुळे झाले आहेत.
२०१२-१३ आणि २०१४-१५ या कालावधीत भारताने सैनिकांचे विशेष पोशाख आणि गिर्यारोहणाची साधने (बहुतांश आयात केलेले) यावर तब्बल ६५६६ कोटी रुपये खर्च केले आहेत. यापैकी बहुतांश सियाचेनमध्ये तैनात असलेल्या सैनिकांसाठी आहेत.
सियाचेनच्या आत्यंतिक थंड वातावरणाने अनेक पाकिस्तानी सैनिकांचेही बळी घेतले आहेत. अलीकडच्या काळात, सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा गयारी भागातील पाकच्या एका लष्करी तळाला हिमवादळाने दिलेल्या तडाख्यात १२९ सैनिकांसह १४० लोक दगावले होते.

-सियाचेन हिमनदी हे ‘जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धक्षेत्र’
-२२ हजार फुटापर्यंत उंची असलेल्या या बर्फाळ भागातील तापमान उणे ४५ अंश सेल्सिअसपेक्षाही खाली जाते
-ऑक्सिजनच्या कमी प्रमाणामुळे सैनिकांना आरोग्यविषयक अनेक त्रास