जम्मू-काश्मीरच्या बनिहाल जिल्ह्यात शुक्रवारी स्थानिक पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश मिळवले. काही दिवसांपूर्वीच या दहशतवाद्यांनी बनिहालमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला होता. त्यानंतर आज रामबन पोलिसांनी त्यांना जिवंत पकडले. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली असून त्यांची नावे आरिफ आणि गजनफर अशी आहेत. या दोघांनी बुधवारी बनिहाल-काझीगड रस्त्यावरील बोगद्याजवळ सशस्त्र सुरक्षा दलाच्या दोन जवानांवर हल्ला चढवला होता. यामध्ये एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता तर एक जवान जखमी झाला होता. यावेळी त्यांनी जवानांच्या रायफल्सही पळवून नेल्या होत्या.

आज या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर या रायफल्स आणि बनिहालमधील हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शोपियान सेक्टरमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैन्याला यश आले होते.