जन्म एकदाच मिळतो.. पुन्हा पुन्हा मिळत नाही, हे जरी निर्विवाद सत्य असले तरी अमेरिकेतील एका तान्हुलीला मात्र दोनवेळा जन्म मिळाला.. आणि त्याचे सारे श्रेय वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान आणि डॉक्टर मंडळींच्या कौशल्याला.

मार्गारेट बुमर ही अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणारी महिला. आपण आई होणार आहोत, याची जाणीव तिला गेल्या वर्षी झाली. त्यानंतर तिने स्वतची व होणाऱ्या बाळाची योग्य ती काळजी घेण्यास सुरुवात केली. मात्र, चौथ्या महिन्यात, वैद्यकीय तपासणीतून पोटातील मुलीच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक बाब तिला कळली. या मुलीच्या माकडहाडापाशी टय़ूमर वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रारंभी टय़ूमर फारसा गंभीर वाटत नव्हता. मात्र मार्गारेट २३ आठवडय़ांची गर्भार असताना हा टय़ूमर गर्भाशयातील मुलीसाठी जीवघेणा ठरू शकतो, असे निदान डॉक्टरांनी काढले. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या पर्यायांतून मार्गारेटने एक पर्याय निवडला तो अद्याप गर्भाशयातच असलेल्या तान्हुलीवर शस्त्रक्रिया करण्याचा. ही शस्त्रक्रिया सुमारे पाच तास चालली. या दरम्यान या तान्हुलीला काही काळासाठी गर्भाशयाबाहेर काढण्यात आले. तिच्या माकडहाडापाशी असलेला टय़ूमर काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा तिला गर्भाशयात ठेवून ते शिवण्यात आले. या अवघड शस्त्रक्रियेनंतर १२ आठवडय़ांनी मार्गारेटने तान्हुलीस नव्याने जन्म दिला.