उबेर या कंपनीचे सीईओ ट्रेव्हिस कॅलेनिक यांच्या मातोश्रीचे शुक्रवारी बोट अपघातात निधन झाले. कॅलिफोर्नियातील एका तलावात बोटिंग करत असताना झालेल्या दुर्घटनेत ट्रेव्हिस कॅलेनिक यांची आई बॉनी कॅलेनिक यांचा मृत्यू झाला.  त्या ७१ वर्षांच्या होत्या.

शुक्रवारी बॉनी कॅलेनिक आणि त्यांचे पती डोनाल्ड कॅलेनिक (वय ७८) हे पाईन फ्लॅट लेक येथे बोटिंग करत होते. यादरम्यान त्यांची बोट एका दगडावर आदळली आणि त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेच डोनाल्ड आणि बॉनी या दोघेही बुडाले. बॉनी यांचा या अपघातात मृत्यू झाला असून बचाव पथकांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला आहे. डोनाल्ड हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कॅलेनिक दाम्पत्त्य हे नियमितपणे बोटिंगसाठी जात होते असे समजते. बॉनी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. तर तलावात बुडालेल्या बोटीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कॅलेनिक दाम्पत्त्य हे सेवानिवृत्त असून बॉनी या एका वृत्तपत्राच्या सेल्स विभागामध्ये काम केले होते. तर डोनाल्ड यांनी निवृत्त अभियंता आहेत. डोनाल्ड यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

‘उबेर’ने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे ही माहिती दिली. ही दु्र्दैवी आणि अत्यंत दु:खद घटना असल्याचे ईमेलमध्ये म्हटले आहे. ट्रेव्हिस हे त्यांच्या आईवडीलांच्या भावनिकदृष्ट्या खूप जवळ होते असेही ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. ट्रेव्हिस यांनी २००९ मध्ये उबेर या ऑनलाइन टॅक्सी सुविधा देणाऱ्या कंपनीची स्थापना केली होती.