केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेतंर्गत महाराष्ट्रातील पाच शहरातून स्वस्तातील विमानसेवा सुरू केली जाणार आहे. नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड आणि जळगाव शहरात या सेवेचा प्रारंभ होणार आहे. या सर्व शहरांमधून सप्टेंबरपर्यंत तर नांदेडमधून जून महिन्यापासून सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. उडान योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तासभर प्रवासाच्या पहिल्या निम्म्या जागांना सवलत मिळणार असून त्यांना फक्त २५०० रूपये तिकिट आकारले जाणार आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या या निर्णयामुळे या भागातील हवाई वाहतुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे. उडान ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे.

सोलापूर, कोल्हापूर, नाशिक व जळगाव येथे एअर डेक्कनच्या माध्यमातून तर नांदेड येथून ट्रू जेट विमानसेवा पुरवणार आहे. या योजनेनुसार या मार्गावरील विमानातील एकूण आसनांच्या ५० टक्के आसन या अडीच हजार रुपयांच्या असतील. त्याव्यतिरिक्त आसनांसाठी नियमित मूल्य मोजावे लागेल. या शहरांमध्ये यापूर्वी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. परंतु, काहीना काही कारणाने येथील विमानसेवा बंद पडली होती. आता केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेतला असून या सेवेमुळे या शहरातील व्यापार, पर्यटनास चालना मिळेल असा आशावाद नागरी हवाई मंत्री अशोक गजपती यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील हवाई मार्ग
नांदेड- मुंबई – (जून २०१७)
नांदेड – हैदराबाद- (जून २०१७)
सोलापूर – मुंबई (सप्टेंबर २०१७)
नाशिक (ओझर) – मुंबई (सप्टेंबर २०१७), नाशिक (ओझर) – पुणे (सप्टेंबर २०१७)
कोल्हापूर – मुंबई (सप्टेंबर २०१७)
जळगाव -मुंबई (सप्टेंबर २०१७)