उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला; ‘ऐ दिल..तोडग्यावर यह तो होना ही थाचा चिमटा

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत व्हावे यासाठी या चित्रपटाला विरोध करणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर यांच्यात मध्यस्थी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तिढा सोडवला असला तरी शिवसेनेने मात्र या मुद्दय़ावरून भाजप आणि मनसे या दोघांनाही लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात बोलताना ‘सैनिक कल्याण निधीला खंडणीचा पैसा नको आहे’, असा टोला लगावला. तसेच मुख्यमंत्री, राज आणि करण जोहर यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील आपल्याकडे उपलब्ध नसला तरी हे तिघे मिळून ‘यह तो होना ही था’ हा चित्रपट काढणार असल्याचे आपल्या कानी आले आहे, असा चिमटाही उद्धव यांनी काढला.

पाकिस्तानी कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेने प्रखर विरोध दर्शवला होता. या पाश्र्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि करण जोहर यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मनसेने चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र, सैनिक कल्याण निधीला पाच कोटींचा निधी आणि चित्रपटाच्या सुरुवातीला उरी आणि पठाणकोट हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहात असल्याचा फलक दाखवण्याची सक्ती या दोन अटी मनसे अध्यक्षांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर लादल्या. या सर्व घटनाक्रमावर बोलताना उद्धव यांनी वरील वक्तव्य केले. उद्धव सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत.

भाजपवर पुन्हा टीका

दरम्यान, गोव्यातील सत्ताधारी भाजपवर पुन्हा एकदा ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. गोव्यात भाजपकडून अपेक्षित काम होत नाही, विकास कामेही झाली नाही असे ते म्हणाले. राजकीय कारणामुळे शिवसेना गोव्यात आली नव्हती, पण आता एक पक्ष म्हणून आम्ही गोव्यात सक्रिय होऊ अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडत गोवा सुरक्षा मंचाची स्थापना करणारे सुभाष वेलिंगकर यांच्याशी जागावाटपावरून चर्चा सुरू असल्याचे ठाकरे म्हणाले. दिवाळीनंतर गोव्यात पुन्हा येणार असून त्यावेळी युतीबाबत सविस्तर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच जाहीरनामाही त्याचवेळी प्रसिद्ध केला जाईल, असेही ठाकरे म्हणाले.