कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नसल्याचे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे हा हिरा भारतात परत आणण्याच्या आशा आणखी धुसर झाल्या आहेत. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यासाठी इंग्लंड सरकार बांधिल नाही. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी सांगितले. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया कंपनी घेऊन गेली हे म्हणणे खरे नसून, शीख राजे महाराज रणजितसिंग यांनी तो ब्रिटनला भेट दिला होता, असे सांगत केंद्र सरकारने यापूर्वीच असमर्थता व्यक्त केली होती.  इंग्रज व शीख यांच्यात झालेल्या युद्धात ब्रिटनने तत्कालीन अविभाजित पंजाबमधील शीख साम्राज्यावर ताबा मिळवला होता. त्यानंतर १८५० साली १०८ कॅरटचा हा हिरा तत्कालीन ब्रिटिश सम्राज्ञी महाराणी व्हिक्टोरिया यांना भेट म्हणून देण्यात आला होता. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार आता सांस्कृतिक मंत्रालय आणि सरकार कायदेशीर मार्गापेक्षा शिष्टाईच्या मार्गाने कोहिनूर परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात १५ ऑगस्टपूर्वी याचिका दाखल करणार असल्याचे समजते.