ब्रिटिश संसदेवर एकटय़ाने दहशतवादी हल्ला करणाऱ्या खालिद मसूदचा उद्देश आपल्याला कदाचित कधीच कळणार नाही, हे स्कॉटलंड यार्डने रविवारी मान्य केले आणि यानंतर अशाच हल्ल्यांची योजना असल्याचे दर्शवणारी कुठलीही माहिती नसल्याचेही सांगितले.

५२ वर्षे वयाच्या या हल्लेखोरासह पाच जण ठार झालेला गेल्या आठवडय़ातील हा हल्ला अवघ्या ८२ सेकंदांमध्ये संपल्याचे आता उघड झाले आहे.

त्या दिवशी मसूदने एकटय़ानेच हा हल्ला केल्याची आमची अजूनही धारणा असून, यानंतरही अशाच हल्ल्यांची काही योजना असल्याची कुठलीही गुप्तचर माहिती नाही, असे महानगर पोलिसांचे उपायुक्त नील बसू यांनी सांगितले.

जरी मसूदने एकटय़ाने हल्ल्याची तयारी केली असली तरी  त्याने हे कृत्य का केले हे स्पष्टपणे सांगणे, तसेच हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही बसू म्हणाले. खालिदने हे कृत्य का केले हे आम्हाला कधीच कळू शकणार नाही, ही शक्यता असल्याचे आपण सर्वानी स्वीकारायला हवे. ते कारण त्याच्यासोबतच नष्ट झाले आहे असेही बसू यांनी सांगितले.

खालिदने एकटय़ानेच हा हल्ला केला किंवा त्याचे कुणी साथीदार होते हे शोधण्यासाठी पोलिसांनी या हल्ल्याच्या संदर्भात अटक केलेल्या ११ जणांपैकी दोघांची चौकशी करण्यात आल्यानंतर बसू यांनी हे विधान केले आहे. या हल्ल्याच्या संबंधात अटक झालेल्यांपैकी एक जण अद्यापही कोठडीत असल्याचे ते म्हणाले.

अमेरिकेत नाइट क्लबमध्ये गोळीबार; सिनसिनाटी शहरातील घटना; १ ठार, अनेक जखमी

सिनसिनाटी : अमेरिकेतील सिनसिनाटी शहरातील एका वर्दळीच्या नाइटक्लबमध्ये किमान दोघांनी रविवारी भल्या पहाटे केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एकजण ठार, तर एक डझनहून अधिक लोक जखमी झाले.

सिनसिनाटीतील कॅमियो क्लबमध्ये रात्री दीड वाजताच्या सुमारास झालेला हा गोळीबार नेमका कशामुळे करण्यात आला हे स्पष्ट झालेले नसून अधिकाऱ्यांनीही याबाबत कुठली शंका व्यक्त केली नाही. शनिवारी रात्री या क्लबमध्ये तरुणांची प्रचंड गर्दी असते. यापूर्वी येथे काही अप्रिय घटना घडल्या होत्या, मात्र ही आतापर्यंतची सर्वात वाईट घटना आहे, असे कॅप्टन किम विल्यम्स यांनी सांगितले.

हल्लेखोरांनी १५ लोकांवर गोळ्या झाडल्या. यापैकी काहीजण स्वत:हून या भागातील रुग्णालयांमध्ये गेले, तर इतरांना रुग्णवाहिकांतून हलवण्यात आले. अधिकारी अनेक साक्षीदारांकडून माहिती घेत आहेत, पण क्लबमधील लोकांपैकी अनेकजण येथून निघून गेल्याचे विल्यम्स म्हणाले.

घटनेनंतर अधिकाऱ्यांनी क्लबमधील सुरक्षेचा आढावा घेतला, तसेच जखमींवर प्रथमोपचार केले. मृत व्यक्तीला येथून हलवण्यात आले आहे. किमान एकजण सिनसिनाटी वैद्यकीय केंद्रात गंभीर अवस्थेत दाखल असल्याचे सांगण्यात आले.