लोकसभेतून कॉंग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ज्या पद्धतीने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी २५ खासदारांना सभागृहातून निलंबित केले, त्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.

लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या आणि २५ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्याबद्दल दुःख वाटते आहे. निलंबित करण्यात आलेला एक खासदार तर सभागृहातही नव्हता, अशा आशयाचे ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे भाजपपुढील अडचण वाढणार आहे. या ट्विटच्या मालिकेमध्ये त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचेही आभार मानले आहेत. शत्रुघ्न सिन्हा बिहारचा अभिमान असल्याचे वक्तव्य नितीशकुमार यांनी केले होते. त्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले. नितीशकुमार यांच्या वक्तव्यामुळे आनंद वाटतो आहे. एक मित्र आणि लोकनेता म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


गेल्याच महिन्यात शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीशकुमारांची भेट घेतल्यावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. ते भाजपला सोडचिठ्ठी देणार, अशीही शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती.