पाकिस्तानला भारताबरोबर चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत, असे अजिबात वाटत नाही. संबंध सुधारण्यात पाकिस्तानला अजिबात स्वारस्य नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. ते जम्मूमध्ये बोलत होते. पाकिस्तानकडून सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. २०१४ पासून सुमारे ४०० वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. बीएसएफ आणि लष्कराचे जवान पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना रोखण्यासाठी अनुकूल परिस्थिती लवकरच निर्माण करण्यात यश येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सीमेवरील रहिवासी आपल्या ‘देशाची संपत्ती’ आहे, असेही सिंह म्हणाले. या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने पावले उचलली आहेत. सरकारने बंकर बांधण्याचा निर्णय घेतला असून जवळपास ६० बंकर बांधण्यात आले आहेत. अनेक बंकरची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. नौशेरातील सीमारेषेवरील रहिवाशांशी सिंह यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना थांबतील. आज किंवा उद्या त्यांना असे प्रकार बंद करावेच लागतील, असेही ते म्हणाले.

पाकिस्तान हा आपला शेजारी देश आहे. त्यामुळे आपल्याकडून पहिली गोळी झाडली जाऊ नये, याची काळजी घ्या असे मी बीएसएफच्या महासंचालकांना सांगितले आहे, अशी माहितीही सिंह यांनी यावेळी दिली. सीमेपलिकडून पहिल्यांदा गोळीबार झाला तर प्रत्युत्तर द्या, त्यावेळी गोळ्या किती झाडल्या याचा विचार करू नका, असे सांगून त्यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला.