केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय लष्करात आरक्षण देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) संस्थापक रामदास आठवले यांनी लष्करातही आरक्षण हवं असा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

आरपीआय हा पक्ष एनडीएच्या घटक पक्षांपैकी एक आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी  रामदास आठवलेंच्या मागणीकडे गांभिर्याने पाहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी भारतीय लष्करात आरक्षण असले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या या मागणीचा विचार करावा अशी विनंती मी त्यांना करणार आहे असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. देशसेवा करण्याचा अधिकार समाजातील प्रत्येक घटकाला आहे असे बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. त्यांच्या या विचाराला अनुसरूनच मी लष्करात आरक्षण हवे अशी मागणी केली आहे असंही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

याआधी रामदास आठवले यांनी भारतीय क्रिकेट संघातही आरक्षण असले पाहिजे अशी मागणी केली होती. देशातील तरूणांना लष्करात सहभावी होण्याचे आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे. विनोद कांबळी नंतर आपल्या समाजाचा एकही खेळाडू हा टीम इंडियात सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण असले पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली होती. आता मात्र त्यांनी भारतीय लष्करात आरक्षण असले पाहिजे अशी मागणी केली आहे.

भारतीय क्रिकेट संघात २५ टक्के आरक्षण हवं अशी मागणी याआधी रामदास आठवले यांनी केली होती. लष्करामध्ये नेमके किती टक्के आरक्षण असले पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही मात्र लष्करातही आरक्षण असले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.