भाजपने राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार कधीही राम मंदिराची उभारणी करु शकणार नाही, असे विधान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीला दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असताना शुक्ला यांनी केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ‘प्रभू राम कायमच आमच्या सोबत असतील. न्यायालयाच्या निर्णयानंतर किंवा आपापसातील सहमतीनेच राम मंदिराची उभारणी होईल,’ असेही त्यांनी म्हटले.

केंद्रीय मंत्री शिवप्रताप लखनऊला जाण्याआधी बस्ती येथील मुडघाट येथे थांबले होते. याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यानंतर शिवप्रताप शुक्ला यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावर भाष्य केले. ‘आम्ही (भाजपने) राम मंदिराच्या मुद्यावर निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार राम मंदिराची निर्मिती करु शकत नाही,’ असे शुक्ला यांनी म्हटले. न्यायालयाच्या निकालानंतर किंवा आपापसात एकमत झाल्यावरच राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होऊ शकते, असेही ते पुढे म्हणाले.

विकास दर आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात झालेली घट या मुद्द्यांवरदेखील शिवप्रताप शुक्ला यांनी त्यांचे मत व्यक्त केले. ‘विकास दरात वाढ आणि घट होतच असते. हे काही पहिल्यांदा घडलेले नाही. वस्तू आणि सेवा कर लागू होऊन केवळ ३ महिनेच झाले आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत हळूहळू बदल होत आहेत. संपूर्ण जगात भारताच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे,’ असेही त्यांनी म्हटले.

शिवप्रताप शुक्ला यांनी राम मंदिराचा मुद्दा केंद्र सरकारच्या अजेंड्यावर नसल्याचे स्पष्ट केले. याआधी उत्तर प्रदेश सरकार अयोध्येतील शरयू नदीच्या तटावर प्रभू रामाचा १०८ फुटांचा पुतळा उभारणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. राष्ट्रीय हरित लवादाकडून परवानगी मिळाल्यावर या प्रकल्पावर काम सुरु करण्यात येणार आहे. पर्यटन विभागाने राज्यपालांना दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये याबद्दलची माहिती देण्यात आली.