भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरसह सर्व प्रश्न सामोपचाराने मिटवावेत. त्यात शांततामय, राजनैतिक व संवादाच्या मार्गाचा अवलंब करावा. वेळ पडली तर दोन्ही देशांमध्ये हस्तक्षेपाची आपली तयारी आहे असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी सांगितले.

बान की मून यांच्या प्रवक्त्याने काल जारी केलेल्या निवेदनानुसार संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी भारत व पाकिस्तान यांच्यातील तणावावर अलीकडच्या पाश्र्वभूमीवर तीव्र चिंता व्यक्त केली असून प्रत्यक्ष ताबा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघनही झाले आहे. उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान १९ जवान मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे अशा तणावाच्या परिस्थितीत दोन्ही देशांनी संयम पाळताना तणाव वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

बान की मून यांनी सांगितले की, काश्मीरसह दोन्ही देशातील सर्व प्रश्नांवर राजनैतिक व संवादाच्या मार्गाने तोडगा काढण्याची गरज आहे. जर दोन्ही देशांना मान्य असेल तर आपण मध्यस्थी करण्यासही तयार आहोत. भारताने २८ व २९ सप्टेंबरच्या रात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून सात दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या जैश ए महंमदच्या दहशतवाद्यांनी काश्मीरमधील उरी येथे लष्करी तळावर हल्ला केला होता त्यात १८ जवान हुतात्मा झाले होते.