दिल्ली विद्यापीठातील हिंसेची भीती

दिल्ली विद्यापीठात अलीकडे झाला तसा हिंसाचार होऊ नये यासाठी दिल्ली येथील आंबेडकर विद्यापीठाने काश्मीरमधील कुनान-पोशपोरा सामूहिक बलात्काराच्या घटनेविरोधात २६वा स्मृतिदिन पाळण्याचा कार्यक्रम लांबणीवर टाकला आहे.

लष्कराच्या ४ राजपुताना रायफल्सच्या जवानांनी २३-२४ फेब्रुवारीच्या रात्री कुना व पोशपोरा या खेडय़ातील ४० महिलांवर बलात्कार केला होता. त्याच्या विरोधात स्मृती कार्यक्रम आंबेडकर विद्यापीठात आयोजित केला होता. आंबेडकर विद्यापीठाच्या प्रशासनाने या कार्यक्रमात काही बदल केले असून तो मार्चमध्ये घेतला जाईल असे ई-मेलमध्ये म्हटले आहे.

फॅमिलियल ग्रीफ, रेझिस्टन्स अँड पॉलिटिकल इमॅजिनरी इन काश्मीर या विषयावर शोधनिबंध सादर करणाऱ्या गौहर फाजिली यांनी कार्यक्रम रद्द झाल्याचा ई-मेल मिळाल्याचे सांगितले. उजव्या विचारसरणीच्या धमक्यांपुढे संस्था, शिक्षणतज्ज्ञ व कार्यकर्ते बळी पडत आहेत असे त्यांनी सांगितले. असोसिएशन ऑफ पेरेंट्स ऑफ डिसअ‍ॅपिअर्ड पर्सन्सच्या भावनीत कौर यांचेही भाषण होणार होते. वानेसा चिश्ती व इफात फातिमा यांचेही विचार ऐकायला मिळणार होते.

दिल्ली विद्यापीठाच्या रामजस महाविद्यालयात अलीकडेच एआयएसए व अभाविप कार्यकर्ते यांच्यात हिंसाचार झाला होता. कल्चर ऑफ प्रोटेस्ट्स हा कार्यक्रम आयोजित करून त्यासाठी जेएनयूचे विद्यार्थी उमर खालीद व सेहला रशीद यांना आमंत्रित केले होते, त्यामुळे अभाविपने या कार्यक्रमास विरोध केला होता. एसजीटीबी खालसा कॉलेजने दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेकडून धमक्या आल्याने पथनाटय़ स्पर्धा लांबणीवर टाकली आहे. मार्किटियर्स या कंपनीने दिल्ली विद्यापीठात स्टार्ट अप संकल्पनेची माहिती देण्याचा कार्यक्रम २३ फेब्रुवारीला आयोजित केला होता, पण तोही नंतर लांबणीवर टाकण्यात आला.

अभिव्यक्तिस्वातंत्र्याला विरोध

काश्मीरमधील कुनान व पॉशपोरा येथे लष्कराने लैंगिक हिंसाचार करून बलात्कार केले होते, त्या घटनेच्या विरोधात २३ फेब्रुवारीला आंबेडकर विद्यापीठ व विमेन अगेन्स्ट सेक्स्युअल व्हायोलन्स अँड स्टेट रिप्रेशन या स्वयंसेवी संस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पण हा कार्यक्रम होण्याच्या २४ तास अगोदर या कार्यक्रमातील वक्त्यांना तातडीने ई-मेल पाठवून कार्यक्रम रद्द करण्यात आला. अभिव्यक्तिस्वातंत्र्याला विरोध होत असल्याने हा कार्यक्रम रद्द करीत असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रम रद्द झाल्याचा ई-मेल मिळाला आहे. उजव्या विचारसरणीच्या धमक्यांपुढे संस्था, शिक्षणतज्ज्ञ व कार्यकर्ते बळी पडत आहेत.   -गौहर फाजिली, शोधनिबंध सादरकर्ते