नाही म्हणायला परिवारातील शिस्त थोडय़ाफार प्रमाणात का होईना भाजपमध्ये आहेच. (कथित) व्यक्तीविरोध असला तरी पक्षनिष्ठा कायम असणारे अनेक नेते भाजपमध्ये आहेत. गेल्या दशकात एकदाही न भेटलेल्या या नेत्यावर पंतप्रधान यांची विशेष खप्पामर्जी! इतकी की त्यांची कागदावरदेखील सक्रियता मोदींना नको आहे. या नेत्याचा निवास दिल्लीच्या ‘नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू’मध्ये आहे. म्हणायला हे नेते मराठी आहेत. पण अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये असल्याने भाषा-खानपान गुजराथी. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात या नेत्याचाही सहभाग आहे. थेट म्हणता येणार नाही; काहीसा अप्रत्यक्ष. कुठे ‘सुंदरकांड’ तर कुठे इतर धार्मिक कार्यक्रम. कुठल्याशा वस्तीत कीर्तन. या नेत्याने आलंच पाहिजे हा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. मग कधी नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू तर कधी संबंधित कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठमोठाली पोस्टर्स लावली जातात. कुणी तरी मोदीसमर्थक त्यावर आक्षेप घेतो. वृत्तपत्रांना बातमीला विषय मिळतो. या नेत्याच्या सक्रियतेविषयी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरून येतात! पण मोदी व या नेत्याची ‘मन की बात’ परस्परांपर्यंत पोहोचतच नाही. कदाचित त्यामुळे या नेत्याच्या सक्रियतेविषयी नेहमी चर्चा होते.
असो. सक्रियता केवळ कुणी मान्यता देण्याने होते का? या नेत्याला भेटल्यावर त्याचे उत्तर नाहीच असे येते. कारण, अंमळ सकाळीच या नेत्याचा दिवस सुरू होतो. नॉर्थ अ‍ॅव्हेन्यूमधील कुणा खासदाराच्या घरात या नेत्याचा निवास. समोर छोटेखानी बगीचा. त्यात प्लास्टिकच्या डझनभर खुच्र्या टाकलेल्या. दिवसभर माणसांचा राबता असतो. अंगात साधा कुडता-पायजामा, पायात म्हणायला चप्पल नाही तर स्लिपर! एकेक माणूस येतो. भाजप कार्यकर्ता-समर्थक-हितचिंतक असा गटात मोडणारा. आपली व्यथा सांगतो. कुणाला कुठल्याशा महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी हवी असते. तर कुणाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी. कुणाला तिकीट कापले गेल्याने आपल्या प्रदेशाध्यांना या नेत्याने फोन करावा म्हणून विनंती करायची असते. हरयाणातील कुणाचे नातेवाईक महाराष्ट्रात नोकरीला असतात. नातेवाईकाच्या बदलीसाठी अर्ज-विनंत्यांची दारे बंद झाल्यावर नॉर्थ अ‍ॅव्हेन्यूमधील या नेत्याच्या दारावर थाप मारली जाते. आलेल्या प्रत्येकाला घोटभर चहा पाजला जातो. येणाऱ्या प्रत्येकाची दखल घेतली जाते. त्याची आत्मीयतेने विचारपूस केली जाते. कुणाला खासगी बोलायचे असल्यास समोरच्या पार्कमध्ये एक फेरी मारून विषय समजून घेतला जातो. हाकेच्या अंतरावर हातात ‘टॅब’ घेऊन उभ्या असलेल्या स्वीय सहायकाला सूचना करून फोन जोडून द्यायला हा नेता सांगतो. कधी कुठल्याशा राज्याचा प्रदेशाध्यक्ष, आरोग्यमंत्री तर कधी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री! आलेल्या व्यक्तीचे नाव-पत्ता सांगून ‘मेरिट’च्या आधारवर त्याचे काम करा, अशी विनंती हा नेता करतो. आपली दखल घेतली; ‘भाईं’नी फोन केला, आता आपले काम होईलच- या विश्वासासह कामोऊन आलेला प्रत्येक जण माघारी जातो. कुणाचे काम होण्यासारखे नसेल तर स्पष्ट शब्दात न दुखावता, नाराजी न पत्करता, ‘पाहतो-करतो’ असे न सांगता ‘भाई’ स्पष्ट सांगतात. दिवसभर चहाचा रतीब सुरू असतो. भेटायला आलेल्यांपैकीच कुणी तरी आणलेला ढोकळा-मिठाई उपस्थितांना दिली जाते. दिवसभर हाच क्रम सुरू राहतो. ज्या नेत्याकडे हा सारा ‘जनांचा प्रवाहो’ चालला असतो; तो नेता भाजपच्या लेखी अज्ञातवासात आहे. पण भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना जवळचा वाटतो. दिल्ली विधानसभेच्या रणधुमाळीत व संसद अधिवेशन सुरू नसतानादेखील नॉर्थ अ‍ॅव्हेन्यूमधील एक घर नेहमीच व्यस्त असते. अज्ञातवासात असूनही सदैव कार्यकर्त्यांच्या गराडय़ात असलेल्या या नेत्याचे नाव आहे संजय जोशी.             
-चाटवाला