उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळावलेल्या भाजपने आता आयाराम म्हणजे दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांसाठी सहा महिन्यांसाठी दरवाजे बंद केले आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राज्य संघटनेला पुढील आदेश येईपर्यंत दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यास मनाई केली आहे. त्याप्रमाणे राज्य संघटनेनेही स्थानिक आणि जिल्हास्तरावर सूचना दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या पक्षातील अनेक नेते पक्ष प्रवेशासाठी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांपासून राज्य व जिल्हास्तरीय नेत्यांच्या मागे लागले आहेत. त्यामुळे भाजपने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. भाजपमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांमध्ये बहुतांश जिल्हा पंचायतीचे प्रमूख, ब्लॉक प्रमूख, नगर पंचायत आणि नगरपरिषदांचे प्रमुखांचा समावेश आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांचाही समावेश आहे. या सर्वांनी आता भाजपचे दरवाजे ठोठावण्यास सुरूवात केली आहे.
पक्षाने पुढील आदेश येईपर्यंत इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास प्रतिबंध केला आहे. सामान्य व्यक्तीला पक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल देऊन सदस्य होता येईल. पण दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भाजपमध्ये प्रवेश नसेल, असे भाजपचे राज्य प्रवक्ते चंद्रमोहन यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले, दि. ११ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या पक्षातील नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक झाले आहेत. परंतु, हे स्वार्थी नेते आहेत, त्यांना सत्ताधारी पक्षाचा आनंद घ्यायचा आहे, असा टोला त्यांनी लगावला.
ते म्हणाले, दुसऱ्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीनंतर प्रवेश दिला जाऊ शकतो. आम्ही जर विरोधी पक्षातील नेत्यांना प्रवेश देऊ लागलो तर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. कारण त्यांनी त्यांच्याविरोधात भाजपला मतदान केले आहे. त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्तेही यामुळे नाराज होतील.