उत्तर प्रदेशमध्ये नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीच्या काही दिवस आधीच पक्षांतर्गत यादवी माजल्यामुळे दोन गटात दुभंगलेल्या पक्षाला काँग्रेसबरोबर युती करूनही सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही. सत्तेचा दावा करणाऱ्या अखिलेश यादव यांना हा पराभव अत्यंत जिव्हारी लागला. परंतु, हे सर्व वाद, पराभव विसरून उत्तर प्रदेशमध्ये नव्या दमाने पक्षाला उभारी देण्याचा नारा त्यांनी पक्षाच्या अधिवेशनात व्यक्त केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाजवादी पक्षाने एक नवी घोषणा तयार केली आहे. ‘आपकी सायकल सदा चलेगी नाम से, फिर प्रदेश का दिल जितेंगे हम मिलकर अपने काम से’, या नव्या घोषणेने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा पक्ष प्रमुखांचा प्रयत्न आहे.
अखिलेश यांना पक्षाची धुरा आपल्याकडेच ठेवायची आहे, हे या नव्या घोषणेवरून स्पष्ट होते. मुलायमसिंह आणि त्यांच्या निकटवर्तीयांना पक्षात पुन्हा सक्रीय भूमिका मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे समाजवादी पक्षातील यादवी संपुष्टात येण्याची शक्यता कमीच आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानही ही घोषणा देण्यात आली होती. मात्र, आता ती अधिकृतरित्या स्वीकारण्यात आली आहे. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील वादामुळे मुलायमसिंह यांच्या गटात नाराजीचे सूर होते. अखिलेश वारंवार पक्ष हा मुलायम आणि त्यांच्या नावानेच चालेल, असे स्पष्ट केले होते. यूपीतील निवडणूक जिंकून वडिलांना ती भेट स्वरूपात देण्यात येईल, असे अखिलेश यांनी त्यावेळी वक्तव्य केले होते. परंतु, त्यांचा दारूण पराभव झाला होता.
अखिलेश यांचे लक्ष आता २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष आपल्याच हाती राहील, असे संकेत दिले आहेत. या नव्या घोषणेतून हेच प्रतित होत आहे. आता यावर मुलायमसिंह यादव आणि शिवपाल यादव यांची काय प्रतिक्रिया असेल, याची प्रतिक्रिया सर्वांना आहे. दरम्यान, अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांनी नव्या आमदारांची वेगवेगळी बैठक बोलावली आहे. अखिलेश यादव यांनी २८ तर मुलायम यांनी २९ मार्चला आमदारांची बैठक बोलावली आहे. यापूर्वी निवडणुकीतील पराभवावर मंथन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुलायमसिंह यादव आणि शिवपाल यादव सहभागी झाले नव्हते.