शुद्धीकरण विधीवरून अखिलेश यादव यांचे टीकास्त्र

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शासकीय निवासस्थानी करण्यात आलेल्या ‘शुद्धीकरण विधी’वरून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार टोलेबाजी केली. २०२२ मध्ये राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘गंगाजली’ची फवारणी करू, अशा शब्दांत अखिलेश यांनी योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले.

समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारच्या बैठकीत अखिलेश यादव यांनी पुढील निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्वास व्यक्त करतानाच भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. २०२२ मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ५, कालिदास मार्ग, या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर अग्निशमन दलामार्फत ‘गंगाजल’ची फवारणी करण्यात येईल, असे अखिलेश यादव म्हणाले. ‘शुद्धीकरण विधी’बाबत मला काही देणेघेणे नाही. पण, मुख्यमंत्री निवासस्थानातील तीन मोरांची मात्र काळजी घेतली जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आपण अखिलेश यांच्यापेक्षा एका वर्षांने मोठे आहोत, या योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरूनही अखिलेश यांनी नव्या मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. योगीजी माझ्यापेक्षा एका वर्षांने मोठे असले तरी ते कामाच्या बाबतीत माझ्या खूप मागे आहेत, असे अखिलेश म्हणाले.

दरम्यान, अखिलेश यांच्या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. अखिलेश यांची टीका ‘असभ्य’ असून, त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते, असे भाजपचे प्रवक्ते मनीष शुक्ला यांनी म्हटले आहे.

मुलायम यांची गैरहजेरी

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव, त्यांचे बंधू शिवपाल यादव यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीकडे पाठ फिरवली. मात्र, रामगोपाल यादव यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली.