गत आठवड्यात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले योगी आदित्यनाथ यांचे गुजरात कनेक्शन समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम ग्राऊंड असलेल्या गुजरातशी आदित्यनाथ यांचे एक खास नाते आहे. आदित्यनाथ यांचे मुस्लिम गुरूबंधूही गुजरातचेच आहेत. गुजरातमधील विसनगर येथे नाथसांप्रदायाच्या मठाचे महंत गुलाबनाथ बापू यांचा जन्म मुस्लिम कुटुंबीयात झाला होता. त्यांचे नाव गुल मोहम्मद पठाण असे होते. गुलाबनाथ बापू हे योगी आदित्यनाथ यांचे गुरूबंधू आहेत.
योगी आदित्यनाथ यांचे गुरू महंत अवैद्यनाथ हे गुलाबनाथ बापूंचेही गुरू आहेत. दोघांचेही अत्यंत जवळचे संबंध होते. गुलाबनाथ बापूंचे ६ डिसेंबर २०१६ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले होते. त्यावेळी योगी आदित्यनाथ हे त्यांच्या अंतिम संस्कारावेळी उपस्थित होते. इतकंच नव्हे तर त्यांनी गुलाबनाथ बापूंनंतर मठाच्या महंतपदी नवी नियुक्तीही केली होती. मठाच्या वतीने विसनगर आणि वडगाम येथील मंदिरांचे व्यवस्थापन पाहण्याबरोबर अन्नछत्रची सोय करण्यात आली आहे. वडगाममध्येच महंत गुलाबनाथ यांनी वयाच्या १८ व्या वर्षी दीक्षा घेतली होती.
गुलाबनाथ बापूंची गुरू-शिष्याच्या परंपरेची ही सहावी पिढी आहे. गोरखनाथ मठाचे महंत अवैद्यनाथ आणि योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर गुलाबनाथ बापू हेही नाथ संप्रदायाशी जोडले गेल्यामुळे त्यांचे घनिष्ठ संबंध होते. गुलाबनाथ हे अवैद्यनाथ यांना आपल्या गुरूस्थानी मानत. त्यामुळेच ते आदित्यनाथ यांना आपला गुरूबंधू मानत, अशी माहिती मठाचे नवे प्रमूख शंकरनाथ यांनी दिली. ते म्हणाले, गुलाबनाथ बापू गोरखपूर मठात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत. गतवर्षी गुलाबनाथ बापू गोरखमठात गेल्यानंतर योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सत्कार केला होता. दरवर्षी किमान २ ते ३ वेळा गुलाबनाथ हे विसनगर मठात अवश्य जात.
गुलाबनाथ बापू आजारी पडल्यानंतर योगी आदित्यनाथ हे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी वारंवार फोन करत होते, असेही शंकरनाथ यांनी म्हटले. आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगत आम्ही त्यांना गेल्या २५ वर्षांपासून पाहतो. ते खूपच उर्जावान आणि नव्या विचारांचे व्यक्तिमत्व आहे, असेही शंकरनाथ म्हणाले.