योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून त्यांनी स्थापन केलेली हिंदू युवा वाहिनी अनेकदा चर्चेत आली आहे. हिंदू युवा वाहिनी अनेकदा वादात सापडत असल्याने योगी आदित्यनाथ यांनी संघटनेत नव्या सदस्यांचा प्रवेश बंद केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांची बंद दाराआड बैठक घेत त्यांना वर्तणूक योग्य राखण्याची सूचना केली आहे.

‘भगवा रंग आणि भाजपला’ बदनाम करु नका, असे आदेश योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योगी आदित्यनाथ यांनी रविवारी (३० एप्रिल) गोरखपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्याआधी युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांना संघटनेच्या विचारधारेनुसार वर्तणूक करण्याचा सल्ला दिला.

योगी आदित्यनाथ शनिवारी आणि रविवारी गोरखपूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आदित्यनाथ यांनी गोरखपूर क्षेत्र आणि गोरखपूर मंदिराच्या युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी सरकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सल्ला युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना दिला. युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही कामात त्रुटी आढळल्यास त्यांनी त्याबद्दलची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना करावी, असे आदित्यनाथ यांनी सांगितले. ‘संघटनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नम्रपणे वागावे,’ असे आदेश आदित्यथान यांनी दिल्याची माहिती युवा वाहिनीचे राज्य संघटन सचिव पी. के. मल्ल यांनी दिली.

‘सरकारी योजना सामान्य माणसापर्यंत नेण्यात कोणतीही कसूर ठेऊ नका. सरकारी कामांमध्ये त्रुटी आढळल्यास सरकारी अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. कोणत्याही अधिकाऱ्यांनी गैरवर्तन करु नका,’ अशी सक्त ताकीद योगी आदित्यनाथ यांनी युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना दिली. संघटना आणि भाजपची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी दक्ष राहून काळजी घेण्याचा सल्लादेखील आदित्यनाथ यांनी दिला.