उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यात आली. राज्यात ‘योगीराज’ सुरू झाले असून, त्यांनी ‘आदेशां’चा धडाका लावला आहे. यानंतर यादव ‘पोलीस कर्मचाऱ्यांना हटवण्याची घाट’ अशा आशयाचे ट्विट करणारे आयपीएस अधिकारी हिमांशू कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचे निलंबन केल्याची ही पहिलीच कारवाई आहे, असे सांगितले जाते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जातीपातींवरून भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप निलंबित आयपीएस अधिकारी हिमांशू कुमार यांनी केला होता. यादव आडनाव असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन अथवा त्यांना हटवण्यासाठी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे, असे ट्विट हिमांशू कुमार यांनी केले होते. जातीच्या नावावर लोकांना दंड करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून अधिकाऱ्यांवर दबाव का आणला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. हिमांशू कुमार यांनी केलेल्या ट्विटमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अनेकांनी त्यांच्या ट्विटला रिट्विट केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने शिस्तभंग केल्याच्या आरोपावरून हिमांशू कुमार यांना निलंबित केले आहे. दरम्यान, हिमांशू कुमार यांच्यावर बिहारमध्ये एक खटला सुरू आहे. त्यांच्या पत्नीने त्यांच्याविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करून तक्रार दाखल केली होती. त्यांच्याविरोधात बिहारच्या एका न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे, असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हिमांशू कुमार यांना नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाची कारवाई केल्यानंतर पुन्हा एकदा हिमांशू कुमार यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी सत्याचा विजय होतो, असे म्हटले आहे. हिमांशू कुमार यांचे यादव कुटुंबीय, खासदार आणि दिग्गज नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच त्यांना हवी त्या ठिकाणी नियुक्ती मिळत होती. त्यांना जिल्ह्यातून हटवण्याची हिम्मतही कुणी दाखवत नव्हते, असे सांगितले जाते. तर निवडणूक आयोगानेही त्यांना फिरोजाबादच्या पोलीस अधीक्षकपदावरून हटवले होते, असेही बोलले जाते.

[jwplayer SjGxDFKH]