पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांच्या संगनमताने पंपावर मायक्रो चिप्स (डिव्हाईस) चिटकवून पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांचे पेट्रोल चोरी करत गंडा घालण्याच्या घटना यूपीत उघडकीस आली. सदर प्रकरणी उत्तर प्रदेशातून फरारी असलेल्या आरोपी मास्टरमाईंड विवेक शेट्टे याला ठाणे गुन्हे अन्वेषण पथक आणि एसटीएफ यांनी डोंबवली येथून तर या चिप्स (डिव्हाईस))चे संचालन करण्यासाठी रिमोट बनविणाऱ्या अविनाश नाईक याला पुण्यातून अटक करण्यात आली. या दोघां आरोपींकडून ११० माइक्रोचिप्स आणि १७७ रिमोटसह ऑसिक्लोस्कोप आणि प्रोग्रामर हस्तगत करण्यात आले.

पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ग्राहकांचे  रिमोट चालवून चोरी करण्यात येत होती. उत्तरप्रदेशमध्ये ह मंडळी दरररोज लाखोंची कमाई करत होते. २७ एप्रिल रोजी यूपीच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) लखनऊ येथील ७ पेट्रोलपंपावर छापा मारल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तब्बल दहा वर्ष हा पेट्रोल चोरीचा धंदा सुरु होता. शेट्टे आणि नाईक हे पेट्रोल पंप मालकाला ३ हजार रुपयात विकायचे त्यावर पेट्रोल पंप मालक रोज लाखोंची कामे करायचे. यूपीतून फरार झाल्यानंतर आरोपी विवेक शेट्टे (४७) रा. लोढा हेवन, चंद्रेश व्हिला कॉ. ऑप. सोसायटी निळजे डोंबवली ठाणे याने ठाणे जिल्ह्यातील डोंबवली परिसरात आसरा घेतला. त्याने मायक्रो सीकेटी वर्कशॉप सुरु केले होते. तर रिमोट बनविणारा आरोपी अविनाश मनोहर नाईक(३७) रा. साई विहार अपार्टमेंट, रेल विहार कॉलनी, गुरुद्वारा रोड पिंपरी-चिंचवड पुणे येथे आश्रय घेऊन आकुर्डी परिसरात व्यवसाय सुरु केला. त्याने व्हिजिल सिस्टीम कंपनी सिक्युरिटी आणि होम ऑटोमेशन सुरु केली होती. याबाबतची माहिती एसटीएफ पथकाला लागली. त्यानुसार, एसटीएफ पथकाने ठाणे पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि यूपीची एसटीएफ पथकाने संयुक्त कारवाई करत या चोरी प्रकरणाचा मास्टरमाइंड विवेक शेट्टी याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील अविनाश नाईक याला अटक करण्यात आले.

हे दोघे पेट्रोल पंप मालकाला चिप आणि रिमोट तीन हजारात विकत होते. प्रात्यक्षिक करून दाखवल्यानंतर चिप पेट्रोल पंपावर तर काही ठिकाणी पेट्रोल मोजणी करणाऱ्या मशीनमध्ये लावण्यात येत. ही चिप्स रिमोट द्वारे संचलित करण्यात येत होती. चिप्स लावल्यानंतर एक कर्मचारी ग्राहकाला पेट्रोल भरताना रिमोट दाबायचा त्यामुळे पेट्रोल रिडींग आणि पैसे रिडींग सुरु रहायचे. मात्र, पाइपमधून पेट्रोल बाहेर पडायचे नाही. त्यामुळे ग्राहकाला २०० रुपयांचे पेट्रोल टाकले तर ते १५० रुपयांचेच मिळत. एकदा मशीनमध्ये किंवा पेट्रोल पंपावर चिप्स लावली की ग्राहकाला ६ टक्के पेट्रोल कमी मिळत होते.

आरोपी शेट्टे आणि नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात किंवा पुण्यात अशा प्रकारच्या चिप्स आणि रिमोट विकले आहेत. काय? याचा प्रयोग करण्यात आला आहे काय? याचा तपास आता ठाणे पोलीस करीत आहेत. दरम्यान ठाण्यातून पेट्रोल पंपाच्या कमी पेट्रोल देण्याबाबत आलेल्या तक्रारीच्या अनुशंघाने ठाणे पोलीस तपास करीत आहेत. तपासानंतर या दोन्ही आरोपीना एसटीएयूपी पथकाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.