नोटाबंदीनंतर पैसे काढण्यासाठी बँकेसमोरील रांगेत उभ्या राहिलेल्या ३० वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते बँकेत पोहोचले. त्यांनी महिला आणि नवजात बालकाला रुग्णालयात दाखल केले. बाळाची प्रकृती ठिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पैसे काढण्यासाठी गरोदर असलेली सर्वेशा ही महिला आपल्या सासूसोबत शुक्रवारी बँकेत गेली होती. आदल्या दिवशी पैसे न मिळाल्याने दोघी पुन्हा बँकेसमोरील रांगेत उभ्या राहिल्या होत्या. त्याचवेळी महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिने मुलीला जन्म दिला. रांगेत उभ्या असलेल्या इतर लोकांनी रुग्णवाहिका बोलावली. मात्र, तीही वेळेत आली नाही. तोपर्यंत स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती. रुग्णवाहिका येण्याआधीच पोलीस त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी लगेच माता आणि तिच्या बाळाला रुग्णालयात दाखल केले. नवजात
बालकाची प्रकृती उत्तम असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्वेशाला थोडा अशक्तपणा जाणवत आहे. मात्र, बाळाची प्रकृती उत्तम आहे, असे तिच्या सासूने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या अपघातात सर्वेशाच्या पतीचे निधन झाले होते. सरकारने त्याची नुकसानभरपाई म्हणून पावणे तीन लाखाचा पहिला हप्ता बँकेत जमा केला होता. त्यातील पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो होतो, अशी माहितीही सर्वेशाच्या आईने दिली. आम्ही दोघी गुरुवारीही पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो होतो. पण त्या दिवशी पैसे मिळाले नाहीत. अखेर शुक्रवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत बँकेच्या रांगेत उभ्या
राहिलो. त्याचवेळी सर्वेशाला प्रसूती वेदना सुरू झाल्या. सुरूवातीला मी प्रचंड घाबरलो होतो. मी सर्वेशाला गमावणार तर नाही ना, अशी चिंता मला वाटू लागली. पण तीने बाळाला जन्म दिला, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला रात्री ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी त्याच मध्यरात्रीपासून करण्यात आली. देशभरात एकच संभ्रम निर्माण झाला. सर्वसामान्य लोक बँका आणि एटीएमबाहेर नोटा बदलून घेण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी रांगा लावू लागले. बँकांसमोरील रांगांमध्य आतापर्यंत ७० हून अधिक जणांना विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. देशभरातील चलनकल्लोळ अद्यापही संपला नाही. सरकारकडून हा कल्लोळ थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी, गोंधळ काही कमी झालेला नाही. चलनाचा तुटवडा असल्याने अनेक बँकांमध्ये पुरेसे पैसे नसल्याची माहिती आहे. तर एटीएममध्ये तर खडखडाट आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे.